असोदा येथे तीन दिवस मुक्कामी होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:48 PM2018-04-14T12:48:26+5:302018-04-14T12:48:26+5:30
डॉ.बाबासाहेब यांच्या खान्देशातील पाऊलखुणा
विकास पाटील / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - खान्देशकन्या, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांचे माहेर म्हणून असोदा गाव प्रसिद्ध आहे. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाले आहे. तब्बल तीन दिवस या गावात डॉ.बाबासाहेब मुक्कामी होते. ज्येष्ठ साहित्यिक जयंत पाटील यांनी असोदा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे आजोबा मोतीराम महिपत पाटील व गावातील काही मंडळींच्या पुढाकाराने धनजी रामचंद्र बिºहाडे यांना सरपंच केले.
दलित समाजातील ते पहिले सरपंच होते. ही बाब डॉ. बाबासाहेब यांना कळली असावी, म्हणून कदाचित ते असोद्यात आले व तीन दिवस मुक्कामी राहिले. १९३५ हे ते वर्ष होते. त्या वेळी मी चार वर्षांचा होतो. डॉ. बाबासाहेब यांच्या आठवणी मला आमच्या काकांनी सांगितल्या.
असोदा या गावातील काळू कृष्णा पाटील यांनी दलित बांधवांसाठी त्याकाळी दोन विहिरी खुल्या करून दिल्या होत्या. बिºहाडे सरपंच झाले व दोन विहिरी दलितांसाठी खुल्या केल्याने डॉ.बाबासाहेब यांना खूप समाधान मिळाले. त्यामुळे त्यांचे असोदा गावात आगमन झाले व त्यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाले.
मोतीराम पाटील व डॉ.बाबासाहेब यांचे अतुट असे नाते होते. पाटील वाड्यात डॉ.बाबासाहेब मुक्कामी राहिले होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे जयंत पाटील आवर्जून सांगतात.
२६ मे १९२८ जळगाव येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत भाषण
२३ आॅक्टोबर १९२९- चाळीसगावात अस्पृश्यांकडून स्वागत. टांगा हाकण्यास मनाई. अस्पृश्य व्यक्तीकडून टांगा हाकताना अपघात.
३१ जुलै १९३७ न्यायालयीन कामासाठी धुळ्याला जाताना चाळीसगावला हरिजन सेवक संघाचे नेते बर्वे यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम.याच दिवशी सायंकाळी विजयानंद नाट्यगृहात जाहीर सभा
१७ जून १९३८ धुळ्याच्या शाळा क्र.पाचच्या प्रांगणावर भाषण.१८ जूनला लळींगला जाहीर सभा
१९ जून १९३८ चाळीसगावला अस्पृश्य विद्यार्थी बोर्र्डिंगच्या प्रांगणावर जाहीर सभा
८ डिसेंबर १९४५ शेकाप परिषदेत भाषण.
१५ नोव्हेंबर १९५२ भुसावळच्या डीएस हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा.