डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जळगावचा प्रत्येक दौरा ठरला प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:42 PM2018-04-14T12:42:25+5:302018-04-14T12:43:22+5:30

‘ओबीसी समाज’ शब्दाची सर्वप्रथम सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातून

Dr. Babasaheb Ambedkar's every visit to Jalgaon was inspirational | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जळगावचा प्रत्येक दौरा ठरला प्रेरणादायी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जळगावचा प्रत्येक दौरा ठरला प्रेरणादायी

googlenewsNext
ठळक मुद्देआठवण पहिल्याच दौ-यात घेतले चटणी भाकरीचे जेवण

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - शिक्षण पूर्ण करून सार्वजनिक जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जनआंदोलन उभारले त्याकरिता त्यांनी भारत भ्रमण केले. यामध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश असून डॉ.बाबासाहेब यांचे जळगाव जिल्ह्यात जवळजवळ २९ वेळा येणे झाले. त्यांचा प्रत्येक दौरा प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांच्या भेटीकरिता लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे व या भेटीबाबत मोठी आतुरता असायची.
बाबासाहेब यांच्या जळगाव दौऱ्याचा ऐतिहासिक विचार केला तर ‘ओबीसी समाज’ हा शब्द प्रयोग जळगाव जिल्ह्यातून सुरू झाला आणि तो बाबासाहेब यांनीच सुरू केला, हे विशेष.
भालोद ता.यावल येथे शाळेमध्ये स्टार्ट कमिटीचे सभासद म्हणून आलेले असताना बाबासाहेब यांनी ओ.बी.सी.या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख येथे केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्यात अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या दौºयाच्या आठवणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उजाळा देण्याचा प्रयत्न केला असता या बाबत आंबेडकरी साहित्यिक जयसिंग वाघ यांनी अनेक आठवणी असल्याचे सांगितले.
पहिल्याच दौ-यात घेतले चटणी भाकरीचे जेवण
जयसिंग वाघ यांनी सांगितले की, सर्वप्रथम बाबासाहेब जुलै १९२६ मध्ये जळगावी आले. त्या वेळेस आताच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये ते काही वेळ थांबले. तिथे त्यांनी चटणी व कळण्याची भाकर असे जेवण घेतले. जेवण आटोपल्यावर ते आसोदा येथे संत चोखामेळा वसतिगृहाच्या भेटीकरिता गेले व तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आसोदा येथेच मुक्काम केला. दुसºया दिवशी न्यालयायीन काम आटोपून ते मुंबईला रवाना झाले.
बाबासाहेब यांच्या उपस्थितीत जळगावात ‘महार वतन’ परिषद
डॉ.बाबासाहेब यांनी जळगाव येथे मे १९२८मध्ये ‘महार वतन’ विषयी परिषद भरविली होती. ही परिषद आताच्या व.वा.वाचनालयाच्या प्रांगणात झाली होती. या सभेला अध्यक्ष म्हणून राजमल लखीचंद जैन हेसुद्धा हजर होते. (माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे वडील) त्यांनी महार वतन विधेयकास पाठिंबा दिलेला आहे. याच सभेत डॉ.बाबासाहेब यांचे भाषण सुरु असताना श्रीधर पंत टिळक यांच्या निधनाची तार त्यांना मिळाली त्यांनी ती वाचून दाखवली, श्रद्धांजली वाहिली व टिळकांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. या सभेला जवळ जवळ तीन हजार लोक उपस्थित होते.अन् ओबीसी समाज असा शब्द प्रयोग सुरु झाला.
भालोद येथे शाळेमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मिळणारी वागणूक, अस्पृश्य व आदिवासी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अवस्था या विषयीचे सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९ व २० आॅक्टोबर १९२९ रोजी स्टार्ट कमिटीचे सभासद म्हणून आले होते. या समितीमध्ये एकूण ९ सभासद होते, मात्र या विषयाच्या अभ्यासाची सर्व जबाबदारी बाबासाहेब यांच्यावर सोपविण्यात आली होती. या समितीने भालोद व आजूबाजूचा परिसर निवडलेला होता. या स्टार्ट कमिटीमध्येच बाबासाहेब यांनीओ.बी.सी.या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला व १९३० पासून ओबीसी समाज असा शब्द प्रयोग सुरु झाला.
खान्देश मिलची डॉ.बाबासाहेब यांनी केली वकिली
१९३३मध्ये खान्देश लक्ष्मी विलास मिल विरुद्ध ‘गड्यूएट कोल कंसर्न’ या खटल्या करीता डॉ.बाबासाहेब जळगाव न्यायालयात आले होते. खान्देश मिलचे ते वकील होते. त्यांच्या सोबत डब्लू.डी.प्रधान व जी.एस.गुप्ते हे दोन वकीलदेखील होते.
सिव्हील रिव्हिजन नं ३९०/१९३३ अशी नोंद सदर खटल्याची असून १९३४ मध्ये सदर खटल्याचा निकाल खान्देश मिलच्या बाजूने (डॉ.बाबासाहेब यांच्यायुक्तीवादाने) लागला. डॉ.बाबासाहेब कोर्टात जात असताना लोकांची एवढी गर्दी झाली होती की त्यांना न्यायालयात प्रवेश करणे शक्यच होत नव्हते. अखेरीस पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज सायंकाळी ५.१५ वाजता पूर्ण झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब यांनी व.वा. वाचनालयाच्या प्रांगणात जनतेला संबोधित केले.
डॉ.बाबासाहेबांनी केला स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रचार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ जळगाव जिल्यात आघाडीवर होता. १९३७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी डी.जी.जाधव यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत सेनू नारायण मेढे हे या पक्षाचे बंडखोर उमेदवार म्हणून उभे राहिले. बाबासाहेबांनी जाधव यांच्या प्रचारार्थ जळगाव, जामनेर, शेंदुर्णी, सावदा येथे सभा घेतल्या. जामनेर येथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरवणूक म्हणून तिचा उल्लेख केला जाऊ शकतो. या निवडणुकीत जाधव हे विजयी ठरले.
राजीनाम्याची भूमिका
डॉ.बाबासाहेब यांनी १९५१ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीहून मुंबईला जात असताना भुसावळ व चाळीसगाव येथे एकाच दिवशी जाहीर सभांमधून लोकांना राजीनाम्यामागील भूमिका सांगितली. भुसावळच्या सभेस प्रचंड गर्दी होती. तेथील सभा आटोपून ते चाळीसगावला गेले. तेथे दादासाहेब गायकवाड यांच्याहस्ते बाबासाहेब यांना २००१ रुपयांची थैली देण्यात आली. मात्र सभेत ही थैली कोणीतरी लंपास केली. चाळीसगावाला बाबासाहेबांचे येणे अधिक असायचे कारण येथूनच त्यांना धुळे येथे जाता येत असे. बाबासाहेब यांच्या अशा कितीतरी आठवणींनी जळगाव जिल्हा भारावलेला आहे.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's every visit to Jalgaon was inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.