डॉ. बेहरे यांनी रुग्णांशी संवाद साधत दोन तास केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:25+5:302021-04-12T04:14:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय समितीतील डॉ. अनुपमा बेहरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तास विविध कक्ष व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय समितीतील डॉ. अनुपमा बेहरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तास विविध कक्ष व परिसराची पाहणी करीत रुग्णांशी संवाद साधून कार्यपद्धती जाणून घेतली. केंद्राकडील एका फॉरमॅटमध्ये त्यांनी माहिती भरून घेतली. दरम्यान, त्यांच्याशी संवाद साधताना अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास डॉ. अनुपमा बेहेरे यांनी जीएमसीत येऊन सुरुवातीला बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी वॉर रूममध्ये जाऊन कार्यपद्धती जाणून घेतली. यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बेहरे यांना सर्व मााहिती दिली. यानंतर डॉ. बेहरे यांनी कोरोना रुग्ण दाखल असलेल्या विविध कक्षांमध्ये पाहणी केली. त्यांनी जुना अतिदक्षता विभाग, कक्ष ९, लिक्विड ऑक्सिजन टँक, सीटू कक्ष आदी ठिकाणी पाहणी केली. प्रत्येक कक्षात त्यांनी किमान चार ते पाच रुग्णांशी संवाद साधला. अगदी बारकाईने डॉ. बेहरे यांनी पाहणी केली. साडेबारा वाजेच्या सुमारास पुन्हा बैठक घेऊन डॉ. बेहरे या परतल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्र. डाॅ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाला, डॉ. योगिता बावस्कर, कविता नेतकर आदी उपस्थित होते.
रेमडेसिविरवर विशेष लक्ष
डॉ. बेहरे यांनी सर्व रुग्णांचे कागदपत्रे तपासली. कोणत्या रुग्णांना रेमडेसिवीर दिले जाते, ते निकषानुसारच दिले जात आहे का? याबाबतच त्यांनी विचारणा केली. माहिती जाणून घेतली. यासह सर्व औषधोपचार हे निकषानुसारच होत आहेत की नाही, रुग्णांना जेवण मिळते की नाही, हे थेट त्यांनी रुग्णांकडून जाणून घेतले.