डॉ. पायल तडवीच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी जळगावात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:03 PM2019-06-20T12:03:12+5:302019-06-20T12:03:42+5:30
राज्यभरातून आदिवासी बांधव सहभागी
जळगाव : डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, हत्या झाली आहे. जाती व्यवस्थेने तिचा बळी घेतला असून, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे बुधवारी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली. मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी तडवी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करुन, प्रशासनाचे लक्ष वेधले.
गेल्या आठवड्यात जळगावातील रहिवासी व मुंबई येथे नायर हॉस्पीटलमध्ये पुढील उच्च शिक्षण घेणाºया डॉ. पायल तडवी यांनी वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेप्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून,सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी जळगावतही राष्ट्रीय एकता परिषदेतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय आदिवासी महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम व यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
मोर्चामध्ये डॉ. पायल तडवी यांच्या आई आबेदा तडवी, पती सलमान तडवी व भाऊ रितेश तडवी सहभागी झाले होते.
शिवतीर्थ मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, औरगांबाद यासह राज्याच्या विविध भागातून महिला व पुरुषांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र आले होते.
न्याय द्या.. न्याय द्या.. डॉ. पायलच्या मारेकºयांना फाशी द्या
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेसह इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ व विविध ठिकाणाहून आलेल्या समाजबांधवांनी महाआक्रोश मोर्चातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनिल देहरे व जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानापासून महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी महिला व पुरुषांनी हातामध्ये विविध मागण्यांचे फलक घेऊन, डॉ. पायल तडवी यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्या, तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांवर अॅट्रासिटी कायद्या अंतर्गंत कारवाई करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासह इतर मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.
महिला व पुरुषांसह १० ते १५ हजार समाज बांधव महाआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
या महाआक्रोश मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी शिवतीर्थ मैदानावर सकाळी दहापासूनच गर्दी केली होती.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उमटली असतांना, कुठलाही गैरप्रकार उद्भवू नये, यासाठी शिवतीर्थ मैदानावर व मोर्चाच्या मार्गावर चोख महिला व पुरुषांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जाती व्यवस्थेतून डॉ. पायल यांची हत्या
शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या महाआक्रोश मोर्चाचे रुपांतर सागर पार्कवर सभेच्या रुपामध्ये झाले. या ठिकाणी बोलतांना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सांगितले की, डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, त्यांची हत्या झाली आहे. त्या तिन्ही डॉक्टरांनी डॉ. पायल यांना जाती व्यवस्थेतून त्रास दिला. त्यांचा छळ केला. त्यामुळे जाती व्यवस्थेतूनच त्यांची हत्या झाली असल्याचे सांगितले. तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयींन लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून, ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीदेखील आजही जाती व्यवस्थेचा तिढा सुटला नसल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना अजहरी यांनीदेखील या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या महाआक्रोश मोर्चाला विविध प्रकारच्या ५० हून अधिक सामाजिक संघटना व सर्व समाजबांधवांनी पाठिंबा दिला होता.