शासनाच्या लोककलावंत निवड समितीवर डॉ.सत्यजित साळवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:36 PM2021-08-10T18:36:53+5:302021-08-10T18:37:23+5:30
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर ...
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील गरजू- गरीब लोक कलावंत निवडीसाठी डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे यांची सदर समितीवर निवड करण्यात आली.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. सत्यजित साळवे संचालक असताना सन 2015 ते 2020 या काळात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अनुदान दिलेला "महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोककलांचे सर्वेक्षण व अभ्यास" या बृहद संशोधन प्रकल्पाद्वारे त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील लोक कलावंतांची व लोककलांची माहिती संकलित करून शासनाला सादर केली आहे.
कोरोना काळात आर्थिक विवंचनेनेला सामोरे जाणाऱ्या असंघटित अर्थात एकल लोककलावंतांची झालेली उपासमार लक्षात घेता त्या लोककलावंतांना मानधन देण्याचे शासनाने ठरवले आहे. या कोरोना काळात कोरोना संबंधित जनजागृती, लसीकरण या संदर्भातील जनजागृती इत्यादी कार्यक्रम सदर लोक कलावंतांकडून गाव खेडे वाड्या-वस्त्या येथे गल्लोगल्ली सादर करून त्या कार्यक्रमांचे मानधन रुपये 5000 लोककलावंतांना शासनातर्फे देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लोक कलावंत निवड समितीवर डॉ. सत्यजित साळवे यांची निवड झाल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन, प्र-कुलगुरू डॉ बी.व्ही.पवार ,प्रभारी कुलसचिव डॉ.ए.बी. चौधरी तसेच लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे व प्राध्यापक- शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
लोक कलावंतांना आवाहन
जळगाव,धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील कोरोना काळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अस्सल आणि गरीब- गरजू एकल अथवा तीनच्या गटाने लोककला अर्थात वासुदेव, गोंधळी, कलगीतुरा, भारुड, वाघ्या& मुरळी, पोतराज ,सोंगाड्या पार्टी, आंबेडकरी जलसे सादर करणाऱ्या लोककलावंतांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक कलाप्रकार ,व कलाप्रकार सादरीकरणाचा पुरावा इ. माहिती प्रा.डॉ.सत्यजित साळवे (मो.क्र. 98 233 80 970) या क्रमांकावर व्हाट्सअप करून आपली नोंदणी करावी.