विद्यापीठातील डॉ.तुकाराम दौड बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:23 PM2019-03-22T14:23:53+5:302019-03-22T14:24:00+5:30
सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्तीही रद्द
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील डॉ.तुकाराम दौड यांची सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी रद्द केली आहे. तसेच त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देखील कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांना प्राप्त झाले आहेत.
तुकाराम दौड हे विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख म्हणून २०१२ पासून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती तत्कालीन कुलगुरु डॉ.सुधीर मेश्राम यांनी केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला डॉ.सुधीर भटकर यांनी राज्यपालांकडे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार विद्यापीठ कायद्यातील कलम ७६ (७) अंतर्गत अपील केले होते.
डॉ.भटकर यांनी केलेल्या अपीलावर राज्यपालांनी १६ मार्च रोजी निर्णय देत डॉ.तुकाराम दौड यांची पत्रकारिता विभागातील नियुक्ती रद्द करून त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील आदेश येथे प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ क्षेत्रात बुधवारी दिवसभर याच संदर्भात चर्चा सुरू होती.
काय आहे प्रकरण
डॉ.सुधीर भटकर यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, विद्यापीठाने जनसंवाद आणि पत्रकारिता या विभागासाठी २०१२ मध्ये जाहिरात देवून मुलाखतीव्दारे डॉ.तुकाराम दौड यांची सहयोगी प्राध्यापक पदासाठी ते पात्र नसताना नियुक्ती केली.या पदाच्या पात्रतेसाठी उमेदवाराला सहाय्यक प्राध्यापक म्हणून पुर्णवेळ कार्य केल्याचा किमान आठ वर्षे इतका अनुभव आवश्यक आहे.
मात्र, दौड यांना ८ वर्ष इतका शिक्षक पदाचा मान्यताप्राप्त अनुभव नव्हता. तसेच त्यांनी बनावट कागदपत्र सादर केली. त्याचबरोबर जाहिरातीनुसार इतरही आवश्यक पात्रता डॉ.दौड यांच्याकडे नव्हती. याबाबत डॉ.भटकर यांनी तत्कालीन कुलगुरु सूधीर मेश्राम यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, मेश्राम यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. विद्यापीठाने कारवाई केली नाही म्हणलन डॉ.भटकर यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्यपालांकडे अपील केले होते.