कट प्रॅक्टीस विरोधी कायदा मसुदा समितीत चाळीसगावच्या डॉ. उज्जवला देवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:47 PM2017-08-22T12:47:27+5:302017-08-22T12:49:00+5:30
मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 11 डॉक्टरांचा समावेश
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22 - राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा करण्यासाठी मसुदा समिती गठीत केली असून यामध्ये चाळीसगावच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्वला जयवंतराव देवरे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातून डॉ. देवरे या एकमेव या समितीवर आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांकडून त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.
या समितीत ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 11 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची पहिली बैठक बुधवार, 23 रोजी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सभागृहात होणार आहे.
डॉ. उज्जवला देवरे गेल्या 25 वर्षापासून चाळीसगाव तालुक्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. डॉक्टरांच्या आयएमए संघटनेतही त्यांनी काम केले असून रोटरी व इनरव्हील क्लबसह डॉ. देवरे फाउंडेशनमार्फत अनेक सामाजिक आणि आरोग्यविषय उपक्रम त्या राबवित असतात.
कट प्रॅक्टीसमुळे वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य नष्ट होऊ पाहत असून रुग्णांच्या मन पटलावर डॉक्टरांची प्रतिमा वेगळ्या अर्थाने रंगरुप होत आहे. शासनाने याविरोधी कायदा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आपण अभ्यासपूर्ण सूचना मसुद्यासाठी देणार असल्याचे डॉ. देवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.