डॉ. उल्हास पाटील यांचा ४६ लाख तर, गुलाबराव देवकर यांचा ४४ लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:53 AM2019-04-28T11:53:53+5:302019-04-28T11:54:24+5:30
अंतिम ताळमेळ साधून द्यावे लागणार उत्तर
जळगाव : उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या कालावधीत उमेदवारांनी केलेला खर्च व निवडणूक खर्च विभागाद्वारे पहिल्या तपासणीत तफावत आढळल्यानंतर उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या. शेवटच्या तिसऱ्या तपासणीनुसार रावेर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी ४६ लाख ७९ हजार रुपये खर्च सादर केला. त्या खालोखाल जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी ४४ लाख ४३ हजार रुपये, रावेर मतदार संघातील भाजप-शिवसेनेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ४१ लाख ८७ हजारांचा खर्च तर जळगाव मतदार संघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी ३५ लाख ६४ हजार खर्च सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रचाराची मुदत संपण्याच्या म्हणजे, २१ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘तिसरा’ डोळा होता.
पहिल्या तपासणीत जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी मंडपाचे दर सादर करताना ते शासकीय दरानुसार न दाखविता कमी दराने दाखविल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली होती. तसेच जळगाव मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या खर्चासंदर्भात निरीक्षण नोंद वहीनुसार खर्चाची नोंद नसल्याने त्यांना नोटीस बजावली होती तर जळगाव मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले, मात्र त्या खात्यातून खर्च न करता स्वत: जवळील रोख रक्कम खर्च केल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली. अशाच प्रकारे खर्चासंदर्भात विविध कारणांनी १९ जणांना नोटीस बजावल्या गेल्या. त्यानंतरही खर्च अथवा खुलासा सादर केला नाही म्हणून पुन्हा नोटीस बजावल्या. दुसºया तपासणीत रक्षा खडसे व डॉ. उल्हास पाटील यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्चात तफावत येत असल्याने नोटीस बजावल्या होत्या.
निकालानंतर अंतिम ताळमेळ
उमेदवारांनी प्रचार बंद होण्यापूर्वीपर्यंत १८ एप्रिलपर्यंतचा खर्च निवडणूक खर्च विभागाला सादर केला आहे. या खर्चाची पडताळणी निवडणूक विभागाद्वारे करण्यात आली. प्रचार संपेपर्यंतचा खर्च किती झाला याचीही तपासणी होणार असून त्यासाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक पडताळणी करतील. निकाल लागल्यानंतर ३० दिवसात ही पडताळणी करावी लागणार असल्याचे खर्च शाखेच्यावतीने सांगण्यात आले.
अधिकचा खर्च कसा झाला, याचा ताळमेळ उमेदवार व खर्च निरीक्षक यांच्यातील बैठकीनंतर होणार आहे.
दुसºया व तिसºया तपासणीसाठी कळवूनही जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) उमेदवार शरद गोरख भामरे (सुतार) यांनी नोटिसचा खुलासा सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावली. या सोबतच ओंकार जाधव हे निवडणूक खर्च निरीक्षकांकडे तिसºया तपासणीसाठी हजर राहिले नाही, त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.
असा साधणार खर्चाचा ताळमेळ
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्याअनुषंगाने उमेदवार खर्च सादर करतात. मात्र, खर्च निरीक्षकांचे पथकदेखील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करत असते व त्या अनुषंगाने निवडणूक दरपत्रकाद्वारे हा खर्च उमेदवारांच्या नावाने जमा करण्यात येतो. १८ एप्रिलपर्यंत तपासणी तर झाली आता या खर्चामध्ये तफावत आहे की नाही, या बाबत आता उमेदवार व पथक यांच्या समोरासमोर चर्चा होऊन ताळमेळ साधला जाणार आहे.
उमेदवारांकडून १८ एप्रिलपर्यंत सादर खर्चाची पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. पहिल्या तपासणीवेळी तफावत आढळल्यानंतर त्यांना नोटीस काढल्या होत्या. २० रोजी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक खर्च निरीक्षकांनी तिसरी तपासणी केली. आता निकालानंतर अंतिम पडताळणी होणार आहे.
- प्रवीण पंडित, नोडल अधिकारी, निवडणूक खर्च
यांच्या खर्चावर घेतला आक्षेप
गुलाबराव देवकर
उन्मेष पाटील
डॉ. उल्हास पाटील
रक्षा खडसे
उमेदवार खर्च
डॉ. उल्हास पाटील 46,79,000
गुलाबराव देवकर 44,43,000
रक्षा खडसे 41,87,000
उन्मेष पाटील 35,64,000
अंजली बाविस्कर 3,31,000
महाहंसजी महाराज 1,25,000
मोहन बिºहाडे 71,000
ईश्वर मोरे 69,000
रुपेश संचेती 49,000
ललित शर्मा 34,000
अनंत महाजन 29,000
शरद भामरे 26,000
ओंकार जाधव 25,000
मुकेश कुरील 21,000
राहुल बनसोड 29,000
सुभाष खैरनार 15,000