डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून डॉ.केतकी व डॉ.अनिकेतकडे वैद्यकीय सेवेचा वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:45 PM2018-12-15T12:45:11+5:302018-12-15T12:45:27+5:30
- विजयकुमार सैतवाल उद्योजकाची मुलं उद्योजक होतात, अभिनेत्याची मुलं अभिनेते होतात, वकीलाची मुलं वकील होतात, शिक्षक, प्राध्यापकाची मुलं शिक्षक ...
- विजयकुमार सैतवाल
उद्योजकाची मुलं उद्योजक होतात, अभिनेत्याची मुलं अभिनेते होतात, वकीलाची मुलं वकील होतात, शिक्षक, प्राध्यापकाची मुलं शिक्षक किंवा प्राध्यापक होतात अशाच प्रकारे डॉक्टरांची मुलं ही डॉक्टर होतात, हे सारं स्वाभाविक असले तरी मागच्या पिढीचा वसा जपण्याची संस्कृती आपल्या भारतीय परंपरेत जोपासली जाते. जळगाव शहराच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात असेच एक स्वतंत्र ओळख असलेले कुटुंब आहे, ते म्हणजे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे. त्यांचा वारसा आता डॉ.केतकी व डॉ.अनिकेत पुढे नेत आहेत.
सन १९९६ मध्ये गोदावरी फाउंडेशनचे छोटेसे रोपटे आपल्या आईच्या नावाने डॉ. उल्हास पाटील यांनी लावले. जळगाव जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देशाला शैक्षणिक व वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देताना आईने दिलेला शिक्षणाचा वसा-वारसा म्हणून पुढे चालवला व यशस्वी केला. आज आपल्या आई वडिलांच्या पावलावर- पाऊल ठेवून डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील वारसा म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत पुढे नेत आहे.
जळगाव जिल्ह्यात अनेक व्यावसायिक यशस्वी कुटुंबे आहेत. या कुटुंबातील प्रमुखाने सुरू केलेले व्यवसाय यशस्वीपणे पुढे चालू ठेवणारे वारसही आहेत. यात प्रामुख्याने गोदावरी फाउंडेशनचे नाव घेतले जाते.
आई-वडील शिक्षक, घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुलाला डॉक्टरच करायचे असा ध्यास घेतलेल्या गोदावरी पाटील यांनी डॉ. उल्हास पाटील यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
आईने दिलेला शिक्षणाचा हा वसा, वारसा म्हणून बघताना आईची आठवण सतत राहावी हाच उद्देश ठेवून गोदावरी प्रसुतीगृह नावाचे छोटे रुग्णालय देखील जळगावात सुरू केले.
स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने आईला मातृत्व मिळवून देण्यासाठी अंगी असलेले कसब व हुशारी तसेच उपलब्ध साधनांचा खुबीने उपयोग केला. अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना तान्हुल्या बाळाचीही सुरक्षितता सांभाळत व्यवसाय नाही तर सेवा भाव जोपासला आणि म्हणूनच यशाची ही घोडदौड वैद्यकिय क्षेत्रापुरता मर्यादीत न ठेवता याच लहान बाळांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळून ते जबाबदार नागरिक व्हावे हे आव्हान शैक्षणिक क्षेत्रात अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत गोदावरी फाउंडेशनचे हे छोटेसे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत झाले.
या वटवृक्षाची सावली कमी न होऊ देण्याची जबाबदारी डॉ. केतकी पाटील यांनी स्वीकारली आहे. रेडिआॅलॉजिस्ट असलेल्या डॉ. केतकी पाटील यांनी घर सांभाळून रूग्णालयाच्या कामातही लक्ष घातले आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला अत्याधुनिक स्वरूपाची सेवा आणि उपचार मिळण्यासाठी डॉ. केतकी या नेहमीच आग्रही राहतात. डॉ. उल्हास पाटील यांच्या राजकीय वारसदार म्हणूनही डॉ. केतकी पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणाच्या माध्यमातूनही समाजकारण करता येते असा वडीलांचा स्वभावगुण लक्षात घेत डॉ. केतकी यांची पाऊले आता राजकीय क्षेत्रातही पडू लागली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवातही केली आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्राचा वारसाही डॉ. केतकी पाटील यांनी जोपासला आहे. वैद्यकीय क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र ही दोन्ही क्षेत्रे जनसेवेची आहेत. डॉ. उल्हास पाटील यांनी या दोन्ही क्षेत्रात नाव कमाविले आहे. आता त्यांचाच वारसा पुढे चालवून वडिलांचे नाव आणि घराण्याची ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी डॉ. केतकी पाटील या यशस्वीपणे पार पाडत आहे.