रात्री आठ वाजण्यापूर्वीच साजरा करावा लागणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:02+5:302021-04-10T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करता, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करता, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजण्यापूर्वी जयंती साजरी करावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग वाढल्याने सर्वच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होत आहे. गेल्यावर्षीही अनेक धार्मिक कार्यक्रम व राष्ट्रपुरुषांच्या जयंती साधेपणाने साजरा कराव्या लागल्या होत्या. यावर्षीही कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र न येता अत्यंत साधेपणाने सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभातफेरी, रॅली टाळा
दरवर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्याठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी पाचपेक्षा जास्त नसावी, सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चैत्यभूमी, दादर येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी येथे न जाता घरातून अभिवादन करावे, असेही आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, त्याऐवजी या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे, रक्तदान करावे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी, नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सुचविण्यात आले आहे.
या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेही पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.