संचालकांकडून रुग्णालय प्रशासनाची खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:57 AM2020-06-03T11:57:30+5:302020-06-03T11:57:41+5:30
जळगाव : कोरोना रुग्णालयात दिवसेंदिवस बाधितांचे वाढलेले मृत्यू यावरून मंगळवारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी स्थानिक कोविड ...
जळगाव : कोरोना रुग्णालयात दिवसेंदिवस बाधितांचे वाढलेले मृत्यू यावरून मंगळवारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी स्थानिक कोविड रुग्णालय प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी केली. योग्य औषधोपचार होत नसल्याचा ठपका ठेवत नेमके कसे उपचार करावेत, याची माहिती डॉ़ लहाने यांनी मंगळवारी अधिष्ठतांसह डॉक्टरांना दिली.
कोरोना रुग्णालयात गेल्या आठवडाभरात ३३ तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल १३ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली़ ही बाब अत्यंत धक्कादायक असून मृत्यूदर हा शंभराकडे वाटचाल करीत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे़
कोविड रुग्णालयात मनुष्यबळाचा मुद्दा वांरवार समोर आला आहे़ सद्यस्थितीत मनुष्यबळाची अत्यंत कमतरता असल्याचा मुद्दा या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मांडण्यात आला़ मात्र, डॉ़ लहाने यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही़ आहे त्या सोर्सेसमध्येच योग्य उपचार करा, असे त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे स्थानिक डॉक्टरांपुढेही मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे़
कारवाईचा इशारा
कोविड रुग्णालयात सध्या एका डॉक्टरकडे पाच कक्षांची जबाबदारी असल्याने हा भार खूपच असून यामुळे वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडचणी उद्भवत असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, मंगळवारच्या व्हिसीत डॉ़ लहाने यांनी काही डॉक्टरांवर कारवाईचा इशाराही दिला आहे़