नाटकाचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:13 PM2018-08-17T23:13:19+5:302018-08-17T23:13:44+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी.
खेळ म्हटलं की, डोळ्यासमोर येतं ते मैदान, ते खेळाडू, बॉल, प्रेक्षकांच्या गॅलऱ्या, तो उत्साह आणि बरंच काही. मानवाच्या मनोरंजनाचं खेळ हे प्रभावी माध्यम आहे. आणि ते मानवाच्या बरोबर विकसित झालेलं आहे. केवळ मैदानी खेळ नाहीत तर सर्कशीचा खेळ, सिनेमाचा खेळ. अशा अनेक मनोरंजनाच्या माध्यमांना खेळ ही संज्ञा लागू आहे. तसेच नाटकालासुद्धा लागू आहे. अलिकडच्या सॉफिस्टीकेटेड काळात प्रयोग हा शब्द जास्त रूढ झालेला आहे. पण पूर्वीपासून नाटकाच्या प्रयोगाला खेळ म्हणून संबोधले जाते. शारीरिक खेळांना खेळ म्हणणं एकवेळ समजू शकतं, पण नाटकासारख्या कलेच्या प्रांतात खेळ हा शब्द जरा अलीकडे अवघड वाटतो.
खेळ म्हटलं की त्यात खेळणारे आले व तो खेळ बघणारे आले. या दोघांशिवाय खेळ पूर्णच होऊ शकत नाही. पत्त्यातला पेशन्सचा डाव किंवा मोबाइल नामक मिनी पटांगणावर एकट्याने खेळले जाणारे खेळ याला अपवाद. नाटकाचा खेळ खेळायला दोघेही लागतात. रंगमंच नामक पटांगणावर खेळणारे नट व प्रेक्षागृह नामक गॅलरीत बसलेले प्रेक्षक या दोघांच्या परस्पर सामंजस्यातून हा खेळ होत असतो. रंगमंचावर नट संवाद मुखाने बोलतो, देहबोलीतून त्याचा अर्थ प्रगट करतो, चेहºयातून त्याचा भाव प्रतित होतो. आणि हे सारे पाहून प्रेक्षक सुखावतात, आणि दाद देतात. जशी मैदानातल्या संघर्षाला देतात तशी ही दाद मिळाली की, नट अधिक सुखावतो, तो पुढे जाऊन अधिक चांगले व्यक्त करू लागतो. त्याला पुन्हा दाद मिळते, असे चक्र सुरू होते. नाटक जसजसे पुढे जाते तशी या चक्राची गती वाढू लागते यालाच नाटक रंगणे असे आपण म्हणतो. या चक्राची गती जर कमी-जास्त झाली तर प्रेक्षक कंटाळतो.
खेळाडू आणि प्रेक्षक यात सीमारेषा आखलेली असते. त्या रेषेचे उल्लंघन कोणी करीत नाही. तशीच एक अदृश्य सीमारेषा नट आणि नाटकाचे प्रेक्षक यांच्यात असते. नाटक सुरू असताना नट ती पार करीत नाही किंवा प्रेक्षकही नाही. नाहीतर आपण नाटक पहात आहोत याचे भान न ठेवता रंगमंचावरील भावनाविष्कारात वहात जात प्रेक्षक सहज आक्रमित होऊ शकतो. पण तसे न होता परस्परांवर विश्वास ठेवत हा खेळ सुरू असतो. यालाच ‘मेक बिलीव्ह’चा खेळ असे म्हणतात. प्रेक्षक नाटक बघायला येतात तेच मुळी विश्वासाची खूणगाठ बांधूनच. तू जे दाखवशील, बोलशील, करशील ते आम्हाला मान्य असेल व ते आम्ही आनंदाने पाहू आणि त्यावर खेळाच्या वेळा पुरती का होईना ते खरं आहे, असं समजून विश्वास ठेवू. इतका मोठा सामंजस्याचा अलिखित करार दोघात झालेला असतो. आणि एकदा हा करार झाला की, मग तो प्रेक्षक रंगमंचावरचा कोणताही खेळ बघण्यास तयार होतो. कोणताही खेळ हा पहाताना लागणारा काळ त्या प्रेक्षकाचा असतो. तो खेळ पहात असताना तो आनंदीत असतो, उत्साही असतो, देहभान हरपून तो खेळ पहात असतो. खेळ संपला, हार-जीत झाली की काही क्षण भावनिक होतो खरा, पण काही वेळाने तो खेळ विसरून आपल्या कामाला लागतो. कितीही रोमांचक खेळ जरी झालेला असला तरी सहज विस्मरणात जातो. पण नाटकाच्या खेळाचं तसं नाही नाटक हा भावभावनांचा खेळ आहे. समोर पहात असलेल्या नाटकातल्या भाव भावनांचा संघर्ष पहात असताना प्रेक्षकाच्या कुठल्यातरी अनुभवाशी ते नाटक एकजीव होतं, आणि त्या प्रेक्षकाला पुनर्अनुभवाचा आनंद देऊन जातं. आनंददायी अनुभव जर असेल तर तो सुखावतो. दु:खद अनुभव जरी असला तरी तो त्यात रमतो. यालाच इंग्रजीत कॅथार्सिस असं म्हणतात व तो आलेला अनुभव कायम स्मरणात ठेवतो. अशा या सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर बसून जो प्रेक्षक नाटक पहातो. त्याला खºया अर्थाने या रंगभूमीचा मायबाप या नात्याने संबोधलं जातं व जपलं जातं ..... आहे का हे असं नातं दुसºया खेळात?
-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव