नाटकाचं शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:44 PM2018-11-30T14:44:17+5:302018-11-30T14:44:38+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी...
कलेचं ज्ञान उपजत असतं. कला ही कोणत्या शाळेत जावून येत नाही. कला ही रक्तात असावी लागते. अशी अनेक विधानं कलेच्या बाबतीत केली जायची व आजही केली जातात व ती काही अंशी खरी आहेत.
झडीचे कलेच्या बाबतीत जर काही संवेदनाच नसतील तर त्याच्यात कोठून येणार कलेच्या जाणिवा? पण शेवटी कलेचा संबंध माणसाशी असतो. माणूस हा बुद्धीजीवी असल्याने कोणतीही गोष्ट तो शिकण्यास तयार असतो. मग ते कोणतेही असो. शिकवून दिले जाते ते व शिकून जे मिळते ते ज्ञान. अर्थात कोणतेही ज्ञान मिळवण्यासाठी मनाची तयारी लागते. शिकणाऱ्याची जर शिकण्याची तयारी व क्षमता असेल तर कोणतेही ज्ञान प्राप्त करणे अवघड नाही. कलेच्या प्रांतात शिक्षणाचा वारसा मोठा आहे. यात गुरूशिष्य परंपरेला मोठे स्थान आहे. शिक्षणाच्या जगात कालमानानुसार जे काही क्रांतीकारक बदल झालेत त्याचे पडसाद सर्वदूर उमटलेत. त्यातून कलेचा प्रांत कसा वेगळा राहील? शाळा कॉलेजमधून इतर शिक्षणाबरोबर कलेचे शिक्षण सुरू झाले व त्याला चांगले यश आहे. जवळपास प्रत्येक शिक्षण संस्थेत कलेचे शिक्षण दिले जात आहे. नाट्यकलेचे शिक्षण अभावानेच दिसून येते. संगीत, चित्रकला, नृत्यकला या कलांच्या शिक्षणाचा प्रसार झालेला दिसून येतो पण नाटकाचे तसे नाही. इतर कला व नाटक यात फरक हा आहे की इतर कला या एकल कला आहेत तर नाटक समूहाची कला आहे. यात समूह काम करतो. अनेक प्रकारची तंत्र काम करतात. एकटा नट आपली कला सादर करायची म्हणून संवाद म्हणून दाखवेल, ते अभिनीत करून दाखवेल पण हे म्हणजे नाटक नाही. रंगमंचावर घडणारा किमान दोन व्यक्तींचा संवाद, भोवती अपेक्षित वातावरण, अनुकूल प्रकाश, सुयोग्य संगीत इ. आणि असे अनेक तंत्रातून नाटक प्रकट होत जाते. गायक आपल्या कलेचा रियाज करण्यासाठी तानपुरा घेवून एकट्याने रियाज करू शकतो, चित्रकार हातात ब्रश घेवून रंगाच्या सहाय्याने चित्र काढू शकतो. कवीला कविता स्फुरल्यावर तो कागदावर सहज उमटवतो पण नाटक सादर करायचे म्हणजे या सगळ्याच तंत्राचा कमी-अधिक वापर करून ते सादर करावे लागते. हे सारं सागण्याचा उद्देश असा की नाटकाचे शिक्षण हा तसा खर्चिक विषय आहे. यात नुसता अभिनय शिकवून उपयोगाच नाही. किंवा नुसती थिअरी सांगून भागत नाही तर अभिनय दिग्दर्शनाला साथ लागते ती तंत्र साहित्याची. नुसते साहित्य असून भागत नाही तर त्याला योग्य व परिपूर्ण जागेची आवश्यकता असते. रंगमंचावरची कला शिकायची म्हटल्यावर रंगमंचाची प्रतिकृती ही त्या नाटकाच्या प्रयोग शाळेत आवश्यक आहे. नाटकासाठी नेपथ्य, लाईट्स, रेकॉर्डिंग साहित्य, साऊंड सिस्टीम, रंगभूषेचे साहित्य, वेशभूषा अशा साधनांची गरज या शाळेत लागते. हा सारा खर्चिक प्रकार आहे. काय तर नाटकाचे शिक्षण द्यायचे म्हटले तर खर्चाच्या बाजू अनेक आहेत पण जमेची बाजू ही एकांगी आहे. विद्यार्थ्यांनी दिलेली फी, संस्थेस मिळालेल्या देणग्या. किंवा कार्यक्रमातून मिळालेले उत्पन्न, फार-फार तर शिक्षण संस्थेस अशा विषयांसाठी क्वचितच मिळणारी सरकारी ग्रॅन्ट या पलीकडे जमा नाही. नुसता खूप पैसा, उत्तम इंन्फ्रास्ट्रक्चर, खूप विद्यार्थी असून भागत नाही. तर हा विषय शिकवण्यासाठी तसा डिव्होटेड शिक्षक लागतो. वर्गात खडू, फळा वापरून व्याख्याने देत हे शिक्षण होत नाही नाटक हा भावभावनांचा खेळ आहे व हा खेळ शिकवण्यासाठी त्याला विद्यार्थ्याच्या भावनांशी एकरुप व्हावे लागते, विद्यार्थ्यासोबत तालमीच्या जागेत ा समोर उभे राहून त्याच्या सोबत काम करवून घेतले जाते. नाटक शिकणे यात प्रात्यक्षिकाला महत्त्व आहे. इथं इतकी प्रात्यक्षिकं होतील, सराव होईल तितका विद्यार्थी घडत असतो. विद्यार्थी जितका सराव करेल तितका तो विचक्षण होत जातो. गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिक्षण देण्याची आणि मग या प्रोसेसमध्ये सातत्याने काम केल्यावर त्याचे फळ म्हणून हातात माणिक मोती गवसायला लागतात. त्या गुरूचे नाव मोठे करणारे कलावंत निर्माण होऊ लागतात.
-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव