पशुसंवर्धनमंत्र्यांकडून जळगाव जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:20 PM2018-10-30T13:20:00+5:302018-10-30T13:21:23+5:30
महामार्गालगतच्या शेतांची धावती पाहणी
जळगाव : दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या निमित्ताने व त्याअनुषंगाने बैठकीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द, व तिघरे या महामार्गालगतच्या दोन गावांमधील महामार्गालगतच्या शेतांची धावती पाहणी करीत पुढचा मार्ग पकडल्याने ही पाहणी निव्वळ फार्स असल्याचे दिसून आले.
जानकर हे सोमवार, २९ आॅक्टोबर रोजी दुष्काळाच्या पाहणीसाठी जिल्ह्णाच्या दौºयावर आले होते. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थिती देऊन दुपारी १ वाजता जळगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पीक पाहणी. दुपारी ३ वाजता यावल तहसील कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती व त्यानंतर यावल तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पीक पाहणी असा दौरा होता. मात्र आढावा बैठकीलाच तासभर उशीर झाला. त्यानंतर मंत्र्यांसह अधिकाºयांचा ताफा यावलच्या दिशेने निघाला. याच मार्गावर जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द व तिघरे या दोन गावांमधील शेतांची पाहणी करण्याचे नियोजन करण्यात आले.
पिकावर कीड पडले आहे का?
नागपूर-सुरत महामार्गावरून जाताना नशिराबादच्यापुढे जळगाव खुर्द शिवारात हा ताफा महामार्गावरून खाली उतरून लगतच्याच शेताजवळ पोहोचला. वाहनांमधून उतरून मंत्री जानकर व त्यांच्यापाठोपाठ अधिकारीवर्ग रस्त्यालगतच असलेल्या भागवत भोळे यांच्या शेतात पोहोचला. भोळे यांनी १ एकर शेतात कपाशी लावलेली होती. त्याची आधी किती वेचणी केली? अशी विचारणा जानकर यांनी केली. भोळे यांनी ५० किलो वेचली असल्याचे सांगितले. त्यावर मंत्रीमहोदयांनी पाण्याची सोय नाही का? पिकावर कीड पडले आहे का? याची विचारपूस करीत लगतच असलेल्या ज्वारीच्या शेताकडे मोर्चा वळविला. तेथे कणसाचे दाणे चोळून तोंडात टाकत ते भरले आहेत की नाही? याची पाहणी केली. तेथेच तूरीची काही प्रमाणात लागवड केलेली होती. त्याचीही पाहणी केली. तेथून पुन्हा परत रस्त्यावर येत शेजारच्या विहीरजवळ ते पोहोचले. तेथे खांबावर लावलेला लोखंडी बॉक्स उघडून बघीतला. त्यात विहीरीवरील मोटारीचे फ्यूज असल्याचे पाहून स्टार्टर कुठे आहे? अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर विहिरीत डोकावून पाहिले. विहीर २०० फुटांपेक्षा अधिक खोल असल्याचे व तळाशी पाणी असल्याचे पाहून त्यांनी भूजलचा नियम काय? अशी विचारणा अधिकाºयांना केली. त्यापेक्षाही विहीर खोल असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर रस्त्याच्या पलिकडे काही अंतरावर असलेल्या केळीच्या शेतात जाऊन पाहणी केली.
पाणी नसताना उगीच पैसा का वाया घालता?
केळीच्या शेतात पाहणी करतानाच त्यांनी घडाला लागलेल्या फुलाची (कमळ)भाजी करतात, पत्रकार कुठे आहेत? बरोबर आहे ना? अशी विचारणा केली. तोपर्यंत वाहनांचा ताफा तेथे येऊन थांबला होता. केळीच्या शेताच्या समोर रस्त्याच्या पलिकडे हरभºयाची पेरणी केलेली दिसून आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पाणी नसताना उगीच पैसा का वाया घालता? असा सवाल केला. त्यानंतर वाहनात बसून ताफा पुढे रवाना झाला.
महामार्गालगतच्या शेतात पाहणी
तिघ्रे येथे महामार्गावरच वाहनांचा ताफा थांबला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने तेथे खोदकाम करून सपाटीकरण सुरू आहे. ते काम ओलांडून मंत्री जानकर लगतच्या शेतात पोहोचले. नामदेव भोई यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. सव्वादोन एकरच्या शेतात किती वेचणी केली? अशी विचारणा केली. भोई यांनी एकरी अडीच क्विंटल वेचणी केल्याचे सांगितले. लगतच्या शेतात पेरणी करूनही पिक उगवले नसल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी. नदीजोड प्रकल्प मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पाच-दहा मिनीटे पाहणी करून ताफा यावलकडे रवाना झाला.