चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:56 PM2019-11-15T14:56:29+5:302019-11-15T14:59:03+5:30
ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही.
मोहन सारस्वत
जामनेर, जि.जळगाव : ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. चांगला हंगाम येईल या भरवशावर यंदा घराची दुरुस्ती करण्याचा विचार होता. निसर्गाला तेही पाहवले नाही. टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील कृष्णा सुरेश दुसाने यांची ही आपबिती.
निसर्गाच्या लहरीपणाने यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केवळ नुकसानच झाले नाही तर त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. कृष्णा हे आई शशिकला व पत्नी सोबत वडिलोपार्जित शेती करतात. सात एकरपैकी पाच एकरात कापूस व दोन एकरात ज्वारीची लागवड केली. दीड हजारात ज्वारीचे तर आठ हजारात कापसाचे बियाणे खरेदी केले. लागवडीपूर्वी गावातीलच वि.का. संस्थेकडून ४५ हजारांचे व स्थानिक बचत गटाकडून ४० हजार कर्ज घेतले. बचत गट दोन टक्के व्याज दराने कर्ज देत असल्याने ते परवडते. यामुळे सावकाराकडे जावे लागत नाही, असे कृष्णा सांगतात.
गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ काही पिच्छा सोडत नव्हता. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाने मेहरबानी कायम ठेवल्याने हंगाम चांगला येईल, असे वाटत होते. दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने कहरच केला. तोंडाशी आलेला घास हिरावला. १८ ते २० पोते ज्वारी येईल. २५ ते ३० क्विंटल कापूस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र देवाजीच्या मनात काही वेगळेच होते. ज्वारी तर पूर्णच खराब झाली. चारा म्हणून ढोरंसुद्धा खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. ८० हजार खर्च झाले. हाती काय येईल ते सांगता येत नाही.
ज्वारी हातची गेली. कापूस किती येईल असे विचारता. ते म्हणाले, सात-आठ क्विंटल निघेल असे वाटते. मात्र तीन हजारापेक्षा जास्त कुणी भाव देईल असे वाटत नाही. घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. रब्बी पेरणीबाबत ते म्हणाले, कोरडवाहू असल्याने शक्य नाही. मग आता पुढे काय? असा प्रश्न करताच ते म्हणतात, मजुरी करून दिवस काढावे लागतील. गेल्या वर्षी पाच एकरात २० क्विंटल कापूस व दोन एकरात १८ पोते ज्वारी निघाली होती.
पीक विमा नाही, शासनानेच मदत द्यावी
कृष्णा दुसाने यांनी पीक विमा काढला नाही. शासनाकडून पंचनामा झाला. आता त्यांनीच काही तरी नुकसान भरपाई द्यावी. राज्यात सरकारच नाही. कुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो, असे ते म्हणाले.
कृष्णा यांचे वडील नाही. आईने घर व शेत सांभाळून दोघं भावना मोठे केले. दुर्दैवाने लहान भाऊ सुनील याचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला. त्याचा मोठा आधार होता. गेल्या वर्षी तो गेला. यंदा देवाने असे मारले. दु:ख काही पाठ सोडायला तयार नाही. असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
मातीच्या भिंतीवर पत्रे असून यंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा त्यांचा मानस होता.