खपणाऱ्यांच्या तपोभूमीवर स्वप्नेच बंदिस्त होतील, तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:39 AM2020-03-01T00:39:21+5:302020-03-01T00:40:33+5:30
शुभेच्छा कार्ड या सदरात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक जयंत पाटील...
या शुभेच्छा कार्डात प्रामाणिकपणा आणि सुंदरता हा विषय आहे़
विठ्ठलाच्या काळ्याश्यार मूर्तीला तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभें विटेवरी! करकटावरी ठेवूनिया ।।१।। असे म्हणतात.
मेंढ्या राखणारा एखादा काळ्याशार वर्णाचा धनगर त्या काळ्या शिवारातून उगवून आला आहे, असेच वाटते़ तोही त्या विठ्ठलासारखाच सुंदर आहे़ मी आनंदवनात असताना हेमलकशाला अनेकदा गेलेलो आहे़
आदिवासी गोंंड-माडिया स्त्रिया पाहिल्या आहेत़ त्यांची त्वचा इतकी निर्मळ- जीवनधर्मी असते की, विचारू नका. आपल्या शहरी माणसांची सौंदर्य दृष्टी कॅलेंडरवरून तयार झालेली दिसते़ त्या स्त्रिया प्रत्येक ऋतू त्या ऋतूप्रमाणे भोगतात़ त्यांचे जगणेही तसेच स्वच्छ- प्रामाणिक.
आनंदवनात फॉरेनची काही मंडळी तिकडच्या बिस्किटांचे डबे पाठवायचे. बाबा हेमलकशाला जायच्या वेळी तेथील मुलांसाठी ते डबे आठवणीने घ्यायचे़
स्टुलावर मध्यभागी बिस्किटांचा डबा ठेवलेला असायचा. त्या डब्याभोवती वर्तुळ करून आदिवासी पुरूष, बायका, मुले, उभी राहायची. बाबा सांगायचे, प्रत्येकाने एक- एक बिस्किट घ्यायचे. या आज्ञेचे इतके प्रामाणिकपणे पालन व्हायचे की, विचारू नका़ एकाही स्त्री किंवा मुलाने दोन बिस्किटे उचलल्याचे कधीही दिसले नाही़
अलिकडे आपला बनेलपणा- दाखविगिरी इतकी भीषण पातळीवर पोहचली आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या गौरवाच्या जाहिराती काढून पाहाव्यात.
दुसरी एक गोष्ट अशी पूर्वी माणसांना- तरूणांना घामाचा वास येत नव्हता का? मुंबई - पुण्यात तर घरात ए़ सी़, कार्यालयात ए़सी़ म्हणजे घाम येण्याचा प्रश्नच नाही़ आमचे मानराजपार्क किती छोटेसे. इथेदेखील अनेक घरात बाहेर जाण्यापूर्वी डिओ मारला जातो़ तेव्हा तर वास येतोच़ पण जेव्हा ते गाडीवर बसून हायवेकडे जातात तिथपर्यत तो वास येत राहतो़
ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध एखाद्या ठिकाणी गेल्यावर पसरत नाही़ त्याच मंडळींना यांची गरज असाविशी वाटते़
बाबा आमटेंनी या घामाला, कष्टकऱ्यांच्या घामाला स्वेद - रस म्हटले आहे़
बाबांची कविता़-
‘खपणाºयांच्या तपोभूमीवर
श्रम- रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावे
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली
कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना आकार येईल
स्वेद-रसाची ही मद्यशाळा अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणाºयांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा-पुत्रांच्या स्वप्नांनी बंदीस्तपणा स्वीकारण्याचा इतिहास नाही !
-जयंत पाटील, जळगाव