शेंदुर्णी येथे दारूच्या नशेत माथेफिरूने पेटवली पोलीस चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:37 PM2019-12-21T16:37:04+5:302019-12-21T16:38:17+5:30

शेंदुर्णी पोलीस चौकीत कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचे पाहून समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी या माथेफिरूने दारूच्या नशेत पोलीस चौकीच पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली.

Drinking Mathefiru torched at police station | शेंदुर्णी येथे दारूच्या नशेत माथेफिरूने पेटवली पोलीस चौकी

शेंदुर्णी येथे दारूच्या नशेत माथेफिरूने पेटवली पोलीस चौकी

Next
ठळक मुद्देजामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील प्रकारअवैध धंद्यांना परवानगी मिळत नसल्याने संताप

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : शेंदुर्णी पोलीस चौकीत कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचे पाहून समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी या माथेफिरूने दारूच्या नशेत पोलीस चौकीच पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या माथेफिरूस ताब्यात घेऊन पहूर पोलीस स्टेशनला हलविले.
यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, शेंदुर्णी येथे राहणारा समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी हा दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान पोलीस चौकीत आला. यावेळी तो दारू प्यालेला होता. पोलीस चौकीत यावेळी एकही कर्मचारी नव्हता. चौकीत कोणी नाही, असे पाहून या माथेफिरूने बरोबर आणलेल्या कॅनमधील रॉकेल पोलीस चौकीत सर्वत्र शिंपडले व चौकी पेटवून दिली.
माथेफिरूची आरडाओरड
पोलीस चौकी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. त्यावेळी जवळपास राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. यावेळी हा माथेफिरू बाहेर उभा राहून जोरजोराने ओरडत होता. दोन तीन वेळेस येऊनही पोलीस अवैध धंद्यास परवानगी देत नाहीत, चौकीत कोणीही नसते, असे तो ओरडून सांगत होता, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
नागरिकांची धावपळ
पोलीस चौकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना जवळच्या नागरिकांनी व युवक मंडळींनी धाव घेतली. तोपर्यंत येथे कोणीही पोलीस नव्हते. या युवकांनीच एक ट्रॅक्टर बोलावून पाईपाद्वारे आग विझविण्यास सुरूवात केली. जवळपास अर्धा ते पाऊणतास ही आग सुरू होती. त्यानंतर पोलीस धावून आले. माथेफिरूला नागरिकांनी पकडून ठेवले होते. त्यालाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
वरिष्ठांनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी शेंदुर्णी येथे धाव घेतली. त्यांनी व पहूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी माथेफिरू समाधान पाटील यास तत्काळ पहूर येथे हलविले.
महत्वाची कागदपत्रे नष्ट
या आगीमुळे शेंदुर्णी पोलीस स्टेशनमधील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. कपाटातील काही कागदपत्रे चौकीतून काढण्याचे काम सायंकाळपर्यंत पोलीस करत होते.
पोलीस गायब
३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या शेंदुर्णी गावासाठी १२ पोलीस व दोन अधिकारी अशी पदे अपेक्षित आहेत. पोलीस चौकीत पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक असे पदे मंजूर आहे. मात्र अद्याप कुणाचीही नियुक्ती होऊ शकलेली नाही. केवळ ४ ते ५ पोलिसांवर या चौकीचे कामकाज चालते. हे.काँ. उदय कुलकर्णी यांच्याकडे या पोलीस चौकीचा पदभार असून ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते, असे सांगण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Drinking Mathefiru torched at police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.