वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:29+5:302021-09-22T04:19:29+5:30
जळगाव : शहरातील रस्त्यांवर एकीकडे अतिक्रमण वाढत असतांना, दुसरीकडे रस्त्यावर फिरणाऱ्या गुराढोरांची संख्या वाढली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम ...
जळगाव : शहरातील रस्त्यांवर एकीकडे अतिक्रमण वाढत असतांना, दुसरीकडे रस्त्यावर फिरणाऱ्या गुराढोरांची संख्या वाढली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होत असून, वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढतांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील मुख्यत: बाजारपेठेचा भाग असलेल्या रस्त्यावर ही गुरे दिवस-रात्र बसलेली असतात. यामध्ये सुभाष चौक, चौबे मार्केट, टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता, नेहरू चौक, रेल्वे स्टेशन, भजे गल्ली, बेंडाळे चौक या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोकाट जनावरे एकत्र येऊन फिरतांना दिसून आली. नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जातांना रस्त्यावरच दोन जनावरे उभी होती. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असतांना, दुसरीकडे हे गुरे हल्ला करतील या भितीने नागरिकही सावधगिरीने जातांना दिसून आले. विशेष म्हणजे एका विक्रेत्याने ही गुरे हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्या अंतरावर जाऊन ही गुरे पुन्हा रस्त्यावर उभी राहिल्यामुळे, वाहनधारकांना आणि पादचारी नागरिकांनाही सावधगिरीने जावे लागत होते.
इन्फो :
या मार्गावर वाहने जपून चालवा
एमजी रोड
स्टेशन रोड
नेरी नाका रोड
सुभाष चौक
असोदा रोड
इन्फो :
मोकाट गुराढोरांचा वाली कोण?
शहरातील सर्व रस्त्यांवर दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सकाळी रस्त्यावर बसलेली गुरे व ढोरे रात्रीदेखील त्याच रस्त्यावर फिरत असतात. संबंधित नागरिक ही गुरेढोरे घरीदेखील नेत नाहीत. त्यामुळे ही गुरे कुणाची आहेत, कुठून आली की कुणी सोडून दिली, या गुरांचा वाली कोण? असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.