तहसीलदारांच्या कारवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न; चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:03 AM2020-01-09T11:03:28+5:302020-01-09T11:21:11+5:30
गस्त सुरू असताना घडला प्रकार; आरोपी ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात
अमळनेर : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला ट्रॅक्टरने धडक देऊन उडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे खरदे-वासरे दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांच्या वाहनातून अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात काल रात्रीपासून गस्त घालत होते. आज पहाटेच्या सुमारास खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एका ट्रॅक्टरच्या चालकाने (भीमराव कैलास वानखेडे, रा. चौबारी) तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे नुकसान झाले. या प्रकरणी मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर भीमराव वानखेडेविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 353, 279, 427, 379, 188 अंतर्गत शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वानखेडेला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 2 लाख 70 हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्रॉली वाळूसह जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला करत आहेत.