बेस्ट सेवेसाठी पंधरा दिवसाच्या नियमाला चालक-वाहकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:16+5:302021-03-27T04:16:16+5:30

एस. टी.महामंडळ : कामगार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड ...

Driver-carrier opposition to the fifteen-day rule for best service | बेस्ट सेवेसाठी पंधरा दिवसाच्या नियमाला चालक-वाहकांचा विरोध

बेस्ट सेवेसाठी पंधरा दिवसाच्या नियमाला चालक-वाहकांचा विरोध

Next

एस. टी.महामंडळ : कामगार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनाने आता जळगाव येथून मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजाविण्याचे आदेश दिले आहेत. महामंडळाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत असून, परिणामी कामगार संघटनांनी या निर्णया विरोधात आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शविली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मुंबईतील लोकल सेवा बंद होत्या. त्यामुळे बेस्टतर्फे नागरिकांना वाहतुकीची सेवा देण्यात आली. तसेच या सेवेसाठी मुंबईतील चालक-वाहक अपुरे पडत असल्यामुळे जळगावसह राज्यभरातील विविध आगारातून चालक-वाहक मुंबईला सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. सध्या लोकल सेवा सुरू झाली असली तरी, महामंडळातर्फे या कर्मचाऱ्यांना सेवा बजाविण्यासाठी बोलविलेच जात आहे. आता महामंडळाने आठ दिवसांऐवजी पंधरा दिवस बेस्टच्या सेवेसाठी मुंबईला येण्याचे आदेश काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव विभागातून दर आठवड्याला ५० चालक व ५० वाहक मुंबईला सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. मुंबईहून जळगावला आल्यानंतर अनेक चालक-वाहकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सुरुवाती पासूनच बेस्ट सेवेसाठी जाण्याला कर्मचाऱ्यांमधून विरोध होत आहे. त्यात आता महामंडळाने आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजावण्याचे आदेश काढल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून या सेवेला जाण्यासाठी विरोध दर्शविण्यात येत आहे.

इन्फो

मुंबईला जाऊनही भत्ता मिळत नाही

मुंबईला राहण्याची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येत असून, फक्त जेवणासाठी २५० रुपये भत्ता देण्यात येत आहे. मात्र, ना जादा वेतन ना इतर कुठलेही लाभ देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून सुरुवातीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

जळगाव विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जाऊन आल्यावर देखील, परत जळगाव विभागाला मुंबईला कामगिरीसाठी बोलावून अन्याय केला आहे. आता तर ८ दिवस ऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा संघटनेतर्फे महामंडळा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना, जळगाव विभाग

सध्या महामंडळातर्फे बेस्टच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांना एक आठवडाच मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. पंधरा दिवस पाठविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल.

-श्रावण सोनवणे, प्रभारी विभाग नियंत्रक, जळगाव विभाग

Web Title: Driver-carrier opposition to the fifteen-day rule for best service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.