लॉकडाऊन काळातील वाहन कर्ज फिटत नसल्याने चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:16 PM2020-09-26T23:16:35+5:302020-09-26T23:16:45+5:30
म्हसवे शिवारातील घटना
पारोळा : तालुक्यातील म्हसवे येथील आयशर गाडीचे मालक यांचे लॉकडाऊन काळातील वाहन कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून ३० वर्षीय चालकाने २६ रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
कोरोनाच्या भीषण काळात घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नाही व वाहनांचा व्यवसाय आजही ठप्प झाला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाहन घरीच उभे आहे. कुठलीही वर्दी नाही अश्या परिस्थितीत वाहनावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. त्यात कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न होता. त्यामुळे कर्ज फिटेल कसे या चिंतेत असलेले म्हसवे येथील आयशर गाडीचे मालक भूषण अनिल पाटील हा आज शनिवारी सकाळी घरून कुणालाही काही न सांगता निघून गेला होता. भुषण पाटील दुपारपर्यंत घरी आला नसल्याने शोधाशोध केली असता म्हसवे शिवारातील भगवान शिवराम चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले.
यानंतर गावातील शुभम पाटील , दीपक पाटील, अरुण पाटील यांनी लगेच धाव घेतभ त्याला खाली उतरून कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. भुषण पाटीलच्या पश्चात पत्नी, आई ,वडील, व दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
याबाबत पोलिसात संभाजीराव रावण पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.