अपघातानंतर प्रौढ विव्हळत असताना चालक मदत न करता पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:49+5:302021-05-14T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे (वय ५७, रा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे (वय ५७, रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) यांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नशिराबादजवळील माउली पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला.
रामा शिरोळे हे रेल्वेत नोकरीला होते. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरोळे हे भुसावळ येथून घरून ज्वारी घेण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच. १९ सी.एम. ०७९३) जळगाव खुर्द येथे येत होते. यादरम्यान नशिराबादजवळील माउली पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीला भुसावळकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र. एम.एच. १९ बी.यू. ८९८८) जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रामा शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, हवालदार प्रवीण हाके, किरण बाविस्कर, संतोष केदार यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरोळे यांच्याकडे असलेल्या रेल्वे विभागाच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शिरोळे यास फोनवरून संपर्क साधून प्रकार कळविण्यात आला. त्यांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ज्ञानेश्वर शिरोळे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रामा शिरोळे यांच्या पश्चात पत्नी वत्सला, मुलगा ज्ञानेश्वर, सून हर्षाली व दोन नातवंडे असा परिवार आहे.