बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या चालकाचा परवाना रद्द, आरटीओकडून खासगी बस जप्त
By विलास बारी | Published: October 17, 2023 08:07 PM2023-10-17T20:07:15+5:302023-10-17T20:08:49+5:30
समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने मागून ट्रकला धडक दिल्याने १२ जण ठार झाले होते.
जळगाव : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बस चालवित असताना कानात हेडफोन घालून व्हिडीओ पाहत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा चालक जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढला आहे. पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी एमएच १९ सीएक्स ५५५२ ही संगितम् ट्रॅव्हलची बस जळगाव आरटीओ यांनी जप्त करीत परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच संबंधित बसचालकाचा परवाना निलंबनाची कारवाई पुणे आरटीओ कार्यालयात सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने मागून ट्रकला धडक दिल्याने १२ जण ठार झाले होते. या घटनेनंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक खासगी बसचालक हा कानात हेडफोन घालून समोर स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून व्हिडीओ पाहून बस चालवित असल्याचे दिसत आहे.
संगीतम् ट्रॅव्हलची बस जप्त
हा व्हिडीओ १५ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचा शोध घेतला. ही खासगी बस पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी संगीतम् ट्रॅव्हलची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह पथकाने ही खासगी बस जप्त केली आहे. तसेच या बसचे परमिट निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
चालकावर पुणे आरटीओ कार्यालयात कारवाई
या बसवरील चालक पुणे आरटीओ कार्यालयात हजर झाला आहे. त्याचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच प्रवाशांच्या जिवास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर प्रवासी बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या बसचा शोध घेण्यात आला. त्यानुसार संगितम् ट्रॅव्हलची बस जप्त केली आहे. चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया पुणे आरटीओ कार्यालयात सुरू आहे.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव.