यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:55 PM2018-11-02T16:55:17+5:302018-11-02T16:56:01+5:30
अत्यल्प पाऊस झाल्याने यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा गॅझेटीअरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.
डी.बी.पाटील
यावल, जि.जळगाव : अत्यल्प पाऊस झाल्याने यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा गॅझेटीअरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.
तालुक्यात या वर्षी सरासरीच्या निम्मे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम पूर्णपणे गेला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या अत्यल्प पावसाने या वर्षी तालुक्यातील भू-गर्भातील जलपातळी ५.७१ मीटरने खालावली असल्याने पाण्याअभावी रब्बीचा हंगामही घेता येणार नसल्याने तालुकावासी चिंताग्रस्त आहेत. जळगाव जिल्ह्याच्या नकाशावर यावल तालुका सुजलाम-सुफलाम महणूनच प्रचलित असताना गेल्या अनेक वर्षात प्रथमच तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झाल्याने तालुकावासीयांमध्ये पाणीटंचाईबाबात भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी कधी दुष्काळ पडला नव्हता, अशी चर्चा असली तरी इतिहासात तालुक्यात अनेक वेळा दुष्काळाशी सामना करावा लागल्याचा इतिहास आहे.
तालुक्याची पावसाची सरासरी ७०० मिलीमीटर आहे. या वर्षी पावसाळयात तालुक्यात जूनमध्ये ९ , जुलै १४, आॅगस्टमध्ये ९, तर सप्टेंबरमध्ये १ असे केवळ ३३ दिवस पावसाचे राहिले. या दिवसात झालेल्या पावसाची ३९५ मिलीमीटर नोंद घेण्यात आली आहे. हा सरासरीच्या ५६.६७ टक्के पाऊस आहे. सध्याच्या पिढीने एवढा अल्प पाउस प्रथमच अनुभवलेला असला तरी इतिहासात यापेक्षाही कमी झालेल्या पावसाची नोंद आढळते. यातूनच दुष्काळाची भयानकता खान्देशवासीयांनी अनुभवलेली आहे.
या वर्षी यावल तालुक्यातील आणेवारी महसूल विभागाने ४९ पैसे जाहीर केली असून, शासनाने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ आणि सध्याची पिढी याचा प्रथमच सामना असल्याने तालुकावासी भयभीत झाले आहेत आणि कधी नव्हे गंभीर स्थितीस सामोरे जोव लागणार आहे. यामुळे याआधी या तालुक्यात कधी दुष्काळ जाहीर झाला होता का, असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत.
खान्देशवासीयांना या आधी अनेक वेळा दुष्काळाशी सामना करावा लागला असून, दुष्काळाचे भीषण चटके सहन केल्याचा इतिहास आहे. अर्थात त्याची कारणे वेगवेगळी आहेत. कधी अल्प पावसाने, कधी अती वृष्टीने तर तर कधी खान्देशातील इतिहासकालीन युद्ध परिस्थितीमुळे दुष्काळी स्थिीतीस सामोरे जावे लागले असल्याची जिल्हा गॅझेटीअरमध्ये दुष्काळांची भीषणता नोंदवली आहे. त्यातील भीषणता दर्शवणारी काही वर्षातील पुढीलप्रमाणे आहे.
सन १९५२-५३ : या वर्षी जिल्ह्यात केवळ ३५५ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या निम्मेच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, यावल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव आणि रावेरसह अन्य तालुक्यात जून महिन्यातील अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या उलटल्याने जुलैमध्ये पुनर्पेेरणी करावी लागली. मात्र आॅगस्ट आणि सप्टेबर महिना कोरडा गेल्याने खरिपाची पिके पूर्णपणे जळाली होती. या वर्षात जिल्ह्याची आणेवारी केवळ चार आणे होती. या दुष्काळी परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील एक हजार १५६ गावांतील १३ लाख ३ हजार लोकसंख्येस बसला. आपद्ग्रस्ताचे दु:ख कमी करण्यासाठी शासनासह सेवाभावी संस्थांनी तातडीची उपाययोजना म्हणून मदत केंद्रे उघडली होती. त्यातून मजुरांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विशेष वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या होत्या. जिल्हा दुष्काळ मदत समितीच्या वतीने २४ खाद्य केंद्रे, २० उपहारगृहे चालवली हाती. शासनाकडून या केंद्राना रास्त भावात धान्यपुरवठा करण्यात आला होता. अनेक तालुका मदत समित्यासह जिल्हा मदत समित्यांनी एक लाख १५ हजार ५०० रुपयांचा निधाी गोळा केला होता. मुंबई दुष्काळ सहाय्य समितीनेही एक लाख ३० हजार रुपयांची मदत केली होती. जनावरांच्या चाºयासाठी ६,०७०,. २९ हेक्टर क्षेत्राचे २८ शासकीय कुप चराईसाठी खुले करण्यात आले होते. सातपुडा पर्वतालगत १८ हजार क्षमतेची पाच पशुशिबिरे उघडण्यात आली होती. जिल्हा दुष्काळ निवारण समितीनेही तीन हजार गुरांना आश्रय दिला हेता. याशिवाय मजुरांना शासनाने रोजगार उपलब्ध करून देवून २८ लाख १७ हजार ६३० रुपयाचे जमीन महसूल आणि २५ लाख ५५ हजार २८२ रुपयांचे तगाई वसुलीचे निलंबन केले होते. सध्या शासनाकडून तगाई वसुली केली जात नाही. यासह इतिहासात १९४७ मध्ये गारपिटीने, १८९९ व १९१९ मध्ये अल्प पावसामुळे तर सतराव्या आणि अठराव्या शतकात शिंदे, होळकर, पेंढारी, मराठे सरदार व पेशवाई काळात युद्धजन्य स्थिती व सैन्याच्या धुमाकूळाने अनेकवेळा पिकांचे नासधूस होऊन झालेल्या नुकसानामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याचे जिल्हा गॅझेटीअरमध्ये नोंद आहे.