दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:58 PM2018-11-02T15:58:03+5:302018-11-02T16:00:47+5:30
केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत.
जळगाव : केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेल्या पैसेवारीत या वगळलेल्या पाचही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच या तालुक्यांमध्येही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते, त्यामुळे नजर पैसेवारी जाहीर करताना सर्व गावे ५० पैशांच्या वर होती. मात्र त्यानंतर पावसाअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली.
मात्र केंद्र शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, पेरणीचे प्रमाण, शेतीच्या मातीतील आर्द्रता व भूजल पातळी या निकषांचा वापर केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व धरणगाव वगळता अन्य १३ तालुके या निकषांमध्ये पात्र ठरले असून त्यांना शासनाने तीव्र दुष्काळी घोषितही केले आहे. मात्र असे करताना एरंडोल व धरणगाव तालुक्यांना मध्यम दुष्काळ देखील जाहीर केलेला नाही.
धरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊस
धरणगाव व तालुक्यात यावर्षी १२० पैकी फक्त ३० दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला व तब्बल ९० दिवसाचा पावसाचा खंड पडूनही केंद्राच्या पहिल्या कळ व दुसऱ्या कळ यादीत समाविष्ट न झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे.
२९ आॅगस्ट ते २२ सप्टेंबर या दरम्यान तीन आठवड्यांचा सलग खंड पडूनही दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश झालेला नाही. कापूस, मका, ज्वारीसह इतर पिकांचे उत्पन्न फक्त २० ते २५ टक्के आहे. याची झळ शेतकºयांना बसली आहे.
नंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलती
सुधारित पैसेवारी जाहीर झाल्यानंतर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैश्यांच्या आत प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ यानंतरही या तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळण्यास विलंब होणार असून दुष्काळाची सत्यता पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे तालुके दुष्काळी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे़