बोदवड तालुक्यावर दुष्काळी सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:45+5:302021-08-14T04:19:45+5:30
बोदवड : अगोदरच दुबार पेरणी करून जेमतेम पावसावर पिके वर आली असताना अचानक पावसाने गत १५ दिवसांपासून हुलकावणी दिल्याने ...
बोदवड : अगोदरच दुबार पेरणी करून जेमतेम पावसावर पिके वर आली असताना अचानक पावसाने गत १५ दिवसांपासून हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला असून, त्याचा परिणाम बाजारपेठेवर स्पष्ट दिसत आहे.
तालुक्यात गत १५ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे, त्यात तापमानात वाढ झालेली असून, किमान नागपंचमीच्या मुहूर्तावर तरी पाऊस येईल ही अपेक्षा लागून असताना पाऊस तर आला नाही उलट कडक उन्हामुळे पिके कोमेजली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे.
ही दुष्काळी स्थिती पाहता तालुक्यातील शेतकरी संघटनेने १३ रोजी तहसील कार्यालय गाठत बोदवड तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली आहे.
एक आठवड्यात पिकाचे पंचनामे करा !
निवेदनात नमूद केले आहे की, बोदवड तालुक्यात अद्यापर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने पीकस्थिती बिकट आहे. तालुक्यात प्रामुख्याने मका, कपाशी, तूर, सोयाबीन लागवड जास्त प्रमाणात आहे. त्यात मका सुकत असून, कपाशीची फूलपाती गळत आहे. अशा परिस्थितीत जर पाऊस आठ दिवसात पडला नाही तर शेतकरी वर्गावर मोठे संकट येईल. तसेच मजुरांना सुद्धा संकटाचा सामना करावा लागेल. तरी आपण तत्काळ बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करावे व त्याला हेक्टरी किमान २५ हजार रुपये मदत द्यावी नाहीतर त्याच्या हाताला काम म्हणून प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करावी. यामुळे त्यांचा बियाणे व खते, फवारणी, कोळपणी, निंदनीसाठी लागणारा खर्च निघेल, तर भविष्यात गुरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. याचीही दखल घ्यावी, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह शेतकरी राजू चौधरी, लालसिंग पाटील, निवृत्ती ढोले, सुनील बोदवडे, अजय पाटील, किशोर माळी, गोविंद वराडे, प्रकाश टापरे, नाना पाटील यांच्या सह्या आहेत.
फोटो :
तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देताना तालुका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. ( छाया: गोपाल व्यास)