जळगाव जिल्ह्यात बुडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:10+5:302021-09-25T04:17:10+5:30
भुसावळ : जिल्ह्यात शुक्रवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात भुसावळातील दोन जणांचा समावेश आहे. मजुराचा ...
भुसावळ : जिल्ह्यात शुक्रवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात भुसावळातील दोन जणांचा समावेश आहे. मजुराचा खदानीत तर युवकाचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला.
अजय राजू वानखेडे (१९, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) व अब्दुल शहा इब्राहिम शाह (३५, रा. दीनदयाळ नगर भुसावळ) असे या बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता व दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
अजय वानखेडे हा मित्र मोहित वसंत धुंडले याच्या आजीचा अंत्यविधी आटोपून तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीजवळील छोट्या पुलावर गेला होता. त्याच वेळेस पाय घसरून तो तापी नदीत बुडाला. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मांडवे दिगर गावाजवळ खदानीत हातपाय धूत असताना तोल गेल्याने अब्दुल शहा इब्राहिम शाह याचा दुपारी बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजुरांनी त्यास तत्काळ पाण्यात काढून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
वाघडू ता. चाळीसगाव : जामठी ता. चाळीसगाव शिवारातील विहिरीत पडून शांताराम बापू मदने (७२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कन्हेरे येथे महिलेचा मृत्यू
अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथील एका विवाहितेचा नदीत पाय घसरून डोक्याला खडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सकाळी पावणेबारा वाजता घडली. ललिताबाई अरुण पाटील असे या महिलेचे नाव आहे. ती बोरी नदीतून जात असताना फापोरे वॉटर सप्लाय विहिरीजवळ तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला दगड लागून तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती आहेत.