भावंडांच्या बुडून मृत्यूने सारेच हळहळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:19 AM2021-09-21T04:19:57+5:302021-09-21T04:19:57+5:30
पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना ...
पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी घडल्या. भावंडांच्या या अचानक जाण्याने परिसर जणू हळहळला.
पहूर, ता. जामनेर : तलावाजवळ खेळत असताना पाण्यात बुडून चुलत बहीण-भावंडाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी (दि. १९) दुपारी १.३० वाजता घडली. मानवी नितीन जोशी (७) व रुद्र गोरख जोशी (५) आशी मृत बहीण-भावंडांची नावे आहेत. रुद्र हा एकुलता मुलगा होता. जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी ते व त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेले होते. गोरख जोशी यांचे भाऊ जांभूळ गावात राहतात. पण मुले खेळण्यासाठी गोरख यांच्याकडे शेतात जातात. रविवारी खेळता खेळता ही मुले पाण्याकडे गेली आणि पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आरडाओरड झाली.
घटनास्थळी नामदेव जाधव, युवराज शेळके, गणेश पांढरे, अजय जोशी व अनिल पवार यांनी तात्काळ चिमुकल्यांना बाहेर काढले व पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसपाटील सुनील शेवाळे यांनी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, गोपाळ माळी, भरत लिंगायत यांनी धाव घेऊन पाहणी केली. शोकाकुल वातावरणात जांभूळ येथे चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानवी ही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
सख्ख्या भावांचा मृत्यू
चाळीसगाव : तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघळी गावालगतच्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी घटना घडली. साहिल शहा शरीफ शहा फकीर ( १४) आणि आयन शहा शरीफ शहा फकीर (१०) अशी या भावांची नावे आहेत. तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते. परंतु नंतर ते परत आलेच नाही. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता दोघांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, याकामी सरपंच द्वारकाबाई धनगर, उपसरपंच नीलेश गंगेले, पोलीसपाटील गायत्री बरहाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. विशेषतः गावातील तरुणांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्या दोघांचा शोधकार्य सुरू ठेवले होते. दोघांच्या पश्चात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असून, मुलांचे वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.