दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईच करता येईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:13+5:302021-07-05T04:12:13+5:30

‘ब्रेथ ॲनालायझर’ वापरास अजूनही परवानगी नाहीच लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे कारवाई होत नसल्याची संधी साधून मद्यपी अगदी ...

Drunk driving; Corona can't take action! | दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईच करता येईना !

दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाईच करता येईना !

Next

‘ब्रेथ ॲनालायझर’ वापरास अजूनही परवानगी नाहीच

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे कारवाई होत नसल्याची संधी साधून मद्यपी अगदी सुसाट सुटले असून, बिनधास्तपणे मद्य पिऊन वाहने दामटत असल्याचे चित्र शहरात दिसून आले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने पोलीस महासंचालकांनी गेल्यावर्षी ‘ब्रेथ ॲनालायझर’ वापरास बंदी घातली होती, त्याला अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे वाहतूक शाखेकडे हे यंत्र धूळखात पडले आहे. त्याचा वापर करायला मर्यादा आल्या आहेत, त्याचाच गैरफायदा मद्यपी घेत आहेत. त्याचा परिणाम अपघाताची संख्याही वाढू लागली आहे.

कोरोनाच्या काळात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ ची एकही कारवाई झाल्याची नोंद पोलिसांकडे नाही, अर्थात ‘ब्रेथ ॲनालायझर‘ यंत्र वापरण्याचीच परवानगी वाहतूक पोलिसांना नव्हती. याचा अर्थ असाही नाही की लॉकडाऊन काळात कोणीच मद्यप्राशन केले नाही व वाहन चालविले नाही. मद्य विक्रीलाही बंदी असली तरी या काळात लपूनछपून मद्य विक्री सुरुच होती. त्याच काळात जळगावात अवैध मद्य तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले. असे असले तरी कागदावर मात्र एकही ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’कारवाई नाही. २०१९ मध्ये १३१ कारवाया झालेल्या आहेत. २०२० व २०२१ मध्ये जूनपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. इतर कारवायांचा आकडा मात्र मोठा आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्याची गरज भासलीच तर तोंडाला मास्क सक्तीचा करण्यात आला होता. तळीराम ओळखण्यासाठी पोलिसांकडे असलेले ब्रे‌थ ॲनालायझर यंत्र वापरासही बंदी असल्याने तळीराम मात्र जोरात सुटलेले आहेत.

‘ब्रेथ ॲनालायझर’ चा वापर बंद

कोरोनाचा प्रसार आता कमी झाला आहे, दुसरीकडे मद्याची दुकानेही सुरु झालेली आहेत. असे असले तरी ‘ब्रेथ ॲनालायझर‘ यंत्र वापरण्याची परवानगीच मिळालेली नसल्याने मद्यपींवर कारवाई करताना पोलिसांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधी जानेवारी महिन्यात शहर वाहतूक शाखेच्या ‘इंटरसेफ्टर व्हेईकल’ या अत्याधुनिक वाहनातील ‘ब्रेथ ॲनालायझर‘ द्वारे १२ तर फेब्रुवारी महिन्यात ५ अशा १७ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात ३ जणांना पकडून त्यांची रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ३१ डिसेंबरच्या रात्रीही १४ तळीरामांवर कारवाई करण्यात आली, मात्र यात ‘ब्रेथ ॲनालायझर‘ चा वापर झाला नाही. वर्षभरात फक्त ३५ तळीरामांवरच कारवाई झाली.

कोट...

तत्कालीन पोलीस महासंचालकांनी लॉकडाऊन काळात ‘ब्रेथ ॲनालायझर’ यंत्र वापरण्यास बंदी घातली होती. एखादी व्यक्ती मद्य प्राशन करुन वाहन चालवताना आढळला तर त्याला रुग्णालयात नेऊन मद्यपी तपासणी केली जाते. शासनाने अजूनही ‘ब्रेथ ॲनालायझर‘वापरण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या कारवाया कमी आहेत. इतर प्रकारच्या कारवाया मात्र मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई

२०१९ २०२०

जानेवारी : ११ ००

फेब्रुवारी : ०९ ०५

मार्च : ११ ००

एप्रिल : १३ ००

मे : १० ००

जून : ११ ००

जुलै : १३ ००

ऑगस्ट : ०८ ००

सप्टेबर : ०७ ००

ऑक्टोबर : १० ००

नोव्हेंबर : १२ ०३

डिसेंबर : १६ १४

२०२१

जानेवारी : ००

फेब्रुवारी : ००

मार्च : ००

एप्रिल : ००

मे : ००

जून : ००

Web Title: Drunk driving; Corona can't take action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.