मद्यपी पोलिसाला वाहिली अक्षरश: शिव्यांची लाखोली ; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:22 PM2020-07-27T12:22:51+5:302020-07-27T12:24:17+5:30
प्रवाशाला मारहाण केल्यावरून झाला अमळनेर रेल्वे स्टेशनवर वाद
अमळनेर : येथील रेल्वे स्थानकावर २२ रोजी वृद्ध प्रवाशाला मारहाण करणारा पोलीस कर्मचारी व युवा सेनेचा पदाधिकारी यांच्यातील अमळनेर रेल्वे स्टेशनवरील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील संवादानुसार पोलीस कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केल्याने युवासेनेच्या पदाधिकाºयाने चक्क पोलिसाला आपल्या पाया पडायला लावत या वादावर पडदा टाकला आहे.
गुजरातच्या दिशेने जाणाºया रेल्वेमध्ये एक वयोवृद्ध प्रवासी आरक्षण काढून त्याच्या सीटवर झोपला होता. अमळनेर जवळ एका रेल्वे पोलिसाने त्या वृद्ध प्रवासाला उठवून स्वत:साठी जागा मागितली. प्रवाशाने त्या प्रकाराला विरोध केल्याबरोबर रेल्वे पोलिसाने या वृद्ध प्रवासाच्या वयाचा विचार न करता त्याच्या तोंडावर जोरात बुक्का मारला. मारहाणीमुळे प्रवाशाचे दात ओठात घुसले. प्रवाशाच्या तोंडातून रक्त सुरु झाले. त्या स्थितीत 'तो' प्रवासी फलाटावर उतरला.
त्याचवेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील नातेवाईकांना पोचविण्यासाठी स्टेशनवर आले होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. ते कमालीचे संतप्त झाले. त्यांनी आपण रेल्वे समितीचे सदस्य असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला मारहाण का केली याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. शेवटी त्या पोलीस कर्मचाºयाला वैद्यकीय चाचणी करायची का? अशी विचारणा केली. हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी जमा झाल्याने शेवटी पोलिस कर्मचाºयानेदेखील माघार घ्यायला सुरुवात केली. याच दरम्यान श्रीकांत पाटील यांनी पोलीस कर्मचाºयाला शिव्याची लाखोली वाहिली. वरिष्ठांकडे तक्रार होऊ द्यायची नसल्यास पाया पडण्याचे फर्मान काढले. शेवटी पोलिसाने श्रीकांत पाटील यांच्या पाया पडल्यानंतर या वादावर पडदा पडला. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेला आहे.
युवा सेनेच्या पदाधिकाºयाची दादागिरी कशासाठी
या घटनेत वृद्ध प्रवाशाने केलेल्या तक्रारीनुसार पोलीस कर्मचाºयाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्या विरोधात पोलीस स्टेशनला किंवा रेल्वे समितीकडे तक्रार करणे हा पर्याय होता.तक्रार केली असती तर कदाचित यापुढे मद्यपी पोलीस कर्मचाºयाच्या उपद्रवाला प्रतिबंध बसला असता. मात्र आपल्या पाया पडायला लावण्यामागे युवा कार्यकर्त्याला काय साध्य करायचे होते हा प्रश्न कायम आहे. त्याशिवाय मात्र युवा सेनेच्या पदाधिकाºयाची शिवराळ भाषा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ हा कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उपस्थित होता.
घडलेला प्रकार हा अत्यंत चीड आणणारा होता. प्रसंगानुरूप ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत बोलणे क्रमप्राप्त ठरते. त्यातील शब्द चांगले की वाईट यापेक्षा त्यामागील अन्यायाची चीड आणणाºया भावना महत्त्वाच्या असतात.
-श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना, अमळनेर
माझ्याकडे कोणतीही तक्रार नाही. झाल्या प्रकाराची मी क्लिप पाहिलेली नाही. पोलिसाने माफी मागितली इतकेच मला समजले आहे.
-दिलीप गढरी, पोलिस निरीक्षक, जीआरपी, नंदुरबार