‘दुबार’चे संकट टळले, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:00+5:302021-07-13T04:06:00+5:30
चाळीसगाव : मृग आणि आर्द्रा नक्षत्रावर पावसाची हजेरी तुरळक राहिल्याने अजूनही १० हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. सोमवारअखेर खरिपाच्या ...
चाळीसगाव : मृग आणि आर्द्रा नक्षत्रावर पावसाची हजेरी तुरळक राहिल्याने अजूनही १० हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. सोमवारअखेर खरिपाच्या एकूण ९० हजार हेक्टर लागवडीच्या उद्दिष्टापैकी ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
पावसाचे कोलमडलेले वेळापत्रक आणि त्याच्या विखुरलेल्या रूपामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी नदी, नाले खळाळणाऱ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे.
या वर्षी पावसाचे मान्सूनपूर्व आगमन काहीसे सुखावणारे असले तरी पावसाच्या मूळ नक्षत्रांवर मात्र तो सक्रिय झालाच नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. दरवर्षी ३० जूनपर्यंत खरिपाचा पेरा पूर्ण होतो. या वर्षी मात्र जुलैचा पहिला पंधरवडा उलटायला आला तरी अजूनही खरिपाचे एकूण लागवड क्षेत्र पूर्णत्वास गेले नाही. पावसाने मोठी उसंत घेतल्याने पेरण्यांना तीन वेळेस ब्रेक लागला.
आठ दिवसांपूर्वी तर दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर असताना पिकांना पुनर्वसू नक्षत्राने काहीअंशी तारले.
चौकट
पिके वाढीच्या स्थितीत, पाऊस मात्र गायब
कोरडवाहूसह सिंचनाखालील पिके वाढीच्या स्थितीत असून पावसाची दमदार संततधार अपेक्षित आहे. मात्र पावसाची हजेरी तुरळक असल्याने एकूणच खरिपाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
१. पिकांनी बाळसे धरल्यानंतर पावसाची नितांत गरज असते. नेमका याचवेळी पाऊस गायब झाला आहे.
२. वाढीवर आलेल्या पिकांना पाऊस नसल्याने फटका बसणार असल्याने शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत.
३. पाऊस लांबल्यास खरिपाच्या उत्पन्नात १० ते १५ टक्के घट येण्याची चिन्हे आहेत.
४. गेल्या वर्षी कोरोना तर यंदाही कोरोनासोबतच अस्मानी मारही शेतकऱ्यांना बसत असल्याने ते चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.
चौकट
१० हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या
लेट लतिफ ठरलेल्या यंदाच्या पावसाने परिसरात आपली हजेरी विखुरलेली ठेवली आहे. काही भागात समाधानकारक तर काही भागात त्याची आजही प्रतीक्षा केली जात आहे. खरिपाच्या एकूण ९० हजार हेक्टर लागवड उद्दिष्टापैकी ८० हजार क्षेत्र लागवडीखाली आले आहे. पावसाळ्याची तीन नक्षत्रे संपायला आली तरी, खरिपाची पूर्ण पेरणी होऊ शकलेली नाही.
चौकट
पुनर्वसू पावले, पण..
मृग आणि आर्द्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना सपशेल ठेंगा दाखविल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. पाचपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली, मात्र पावसाची चाल उंदरासारखी तुरुतुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्वसू नक्षत्र पावले असले तरी, खरिपावरील गंडांतर अजूनही टळलेले नाही.
- रविवारअखेर तालुक्यात १९५.१७ टक्के पर्जन्यमान झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.
- तालुक्यात सरासरी ७५० मिमी पाऊस झाल्यास पर्जन्यमानाची टक्केवारी शंभरी गाठते.