सात वर्ष नफ्यात असणारा दूध संघ आठ महिन्यात ६ कोटी तोट्यात- एकनाथ खडसे
By सुनील पाटील | Published: September 23, 2023 10:10 PM2023-09-23T22:10:23+5:302023-09-23T22:10:40+5:30
गैरव्यवहाराची चौकशीही नाही, खडसेंचा आरोप
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सात वर्ष नफ्यात असणारा जिल्हा दूध संघ आठ महिन्यातच ६ कोटी ७२ लाख रुपये तोट्यात गेलेला आहे. सत्ताधारी संचालक मंडळाचे हे अपयश असल्याची टिका आमदार एकनाथ खडसे यांनी केली. मागील गैरव्यवहाराच्या प्रकरणाची चौकशीही केली जात नसल्याचे सांगून खडसे यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर टीका केली.
जिल्हा दूध संघाची सभा रविवारी होत आहे. त्या बैठकीत आमचे संचालक सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे खडसे म्हणाले. गैरव्यवहार, नोकर भरतीसह इतर कारणांनी दूध संघाची निवडणूक गाजली होती. गुन्हा दाखल व्हावा म्हणून खडसे शहर पोलीस ठाण्यात उपोषणालाही बसले होते. आमदार मंगेश चव्हाण व खडसे यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गेल्या सात वर्षात दूध संघ कधीच तोट्यात गेला नाही. मात्र हा दूध संघ भाजपच्या ताब्यात जाताच तब्बल ६ कोटी ७२ लाख रुपये तोट्यात गेला. दिवाळीनंतरच्या काळात दूधाची पावडर विक्रीवर बंदी आणली होती. त्या दोन महिन्यातच संघाला अडीच कोटी रुपयांचा तोटा झाला. आमच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले, मग त्याची चौकशी का केली नाही. कामगारांची चौकशी थांबविण्यात आली. सणासुदीच्या काळातच दूध पावडर निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्यात आली होती, असेही खडसे म्हणाले.