वाळू अभावी कोट्यवधींची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:50 PM2019-01-20T16:50:06+5:302019-01-20T16:50:48+5:30
रात्रीच्या गस्तीत पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई
पारोळा : गेल्या तीन चार महिन्यांपासून वाळू वाहतुकीवर कडक निर्बंध घातल्याने वाळू अभावी कोट्यवधी रुपयांची कामे ठप्प झाली आहेत. शासकीय विकास कामांनाही वाळू अभावी ब्रेक लागला आहे तर अनेक खाजगी कामेही बंद पडल्याने बांधकाम व्यावसायिक व मजुरांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे. एकदाचे वाळू ठेके लिलाव झाले पाहिजे आणि ही वाळू कोंडी सोडविली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पारोळा शहराला लागून बोरी नदी असून या नदीतून वाळू उचल केली जाते. पण शासनाने वाळू ठेके लिलाव न केल्याने चोरटी वाळू वाहतूक जोरात सुरू असते. या बाबत तक्रारी वाढल्या आणि वाळू वाहतुकीवर कडक निर्बंध घातले गेले. चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सव्वा लाख रुपयांचा दंड आकारला गेला आणि वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले.
वाळू वाहतूक थांबल्याने नगरपालिकेची कोट्यवधींची कामे वाळू अभावी रखडली तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतचीही विकास कामे ठप्प झाली आहेत. खाजगी घरांचे बांधकामही वाळू अभावी थांबले आहेत .
पोलीस विभाग आक्रमक
अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागावर सोपविण्यात आली आहे. पण मध्येच पोलीस विभागाला ही अवैध वाळू उपसा व वाहतुकीची कारवाई बाबत अधिकार दिल्याने महसूल विभागापेक्षा पोलीस विभाग आक्रमक झाला आहे. रात्रीची गस्त आता चोरटी वाळू वाहतूक करणाºया वाहनांना पकडण्यासाठी घातली जात असल्याचे चित्र आहे.
शहरात बैलगाडीतून वाळू वाहतूक
वाळू वाहतूक करणारी वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाळू उपशासाठी शक्कल लढवित वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे तालुक्यात बैलगाडीतून वाळू वाहतूक सध्या सुरू आहे. परिणामी गावात अनेक छोटे-मोठे बांधकाम तेवढे सुरू आहे. भल्या पहाटे बैलगाडीतून वाळू वाहतूक सुरू आहे.
लिलाव सुरू करण्याची अपेक्षा
शासनाने प्रलंबित असलेले वाळू ठेक्याचे लिलाव तात्काळ करावेत आणि ही वाळूची कोंडी फोडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या ग्रामपंचायतीला लागून असलेली नदी पात्र असतील अशा ग्रामपंचायतींना वाळू विक्रीची रितसर परवानगी देण्यात यावी, यातून वाळू चोरीला आळा बसेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.