ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रमव्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:57 PM2019-09-10T23:57:51+5:302019-09-10T23:57:55+5:30
ग्रामसेवक आंदोलनाचा परिणाम : मुख्याध्यापक करणार वित्त आयोगाची कामे
भुसावळ : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक हे गेल्या महिनाभरापासून संपावर गेले असल्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. एकंदरीत ग्रामव्यवस्थ्वर या आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे.
तालुक्यातील ग्र्रामपंचायतींची वसुली थांबल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. ग्रामसेवकांचा संप संपत नसल्यामुळे ग्रामपंचायतींचा व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्पुरता कार्यभार सांभाळण्याचे आदेश पंचायत समितीने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक खडू , फळा व विद्यार्थ्यांचे माध्यान्न भोजन सोडून आता १४व्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे करवून घेणार आहेत. त्याचप्रमाणे गावातील कर वसुली करून अर्थव्यवस्था सांभाळणार आहेत. ग्रामसेवकांची कामे मुख्याध्यापकांकडे दिल्यामुळे नागरिक चकीत झाले आहेत. याचा परिणाम शाळेवर होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांनी शाळाबाह्य कामे करून नयेत व या कामावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत तायडे यांनी केले आहे.
९ आॅगस्टपासून ग्रामसेवक विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारल्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा फटका ग्रामपातळीवर बसला आहे. या आंदोलनाचा विशेष परिणाम गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, विकास कामे, ग्रामपंचायतींची करवसुली, कर्मचाऱ्यांचे पगार या कामकाजावर झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक हा शासनाच्या वतीने प्रमुख समजला जातो. त्यामुळे ग्रामसेवक नाही तर इतर कर्मचारी काय काम करत असतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने ग्रामपंचायतींचे तात्पुरते कामकाज पाहण्यासाठी मुख्याध्यापकांना आदेश दिले. त्यामुळे आता ग्रामसेवकांचे कामकाज मुख्याध्यापक सांभाळणार का? जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गावात वसुली करणार काय? चौदाव्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे ठेकेदारांकडून करून घेणार काय? सरपंच व मुख्याध्यापकामध्ये समन्वय जुळणार काय?, टक्केवारीचे कसे करणार? आधीच शिक्षक अतिरिक्त कामांमुळे त्रस्त आहेत त्यात आता या जबाबदारीमुळे गाव सांभाळून शाळा सांभाळण्याचे आव्हान स्वीकारणार काय? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत...