बंदमुळे सुवर्णनगरीत ‘गुरुपुष्यामृत योग’ची खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:10 PM2018-08-10T12:10:30+5:302018-08-10T12:12:06+5:30
सराफ बाजारात शुकशुकाट
विजयकुमार सैतवाल
जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सराफ बाजारही बंद राहिल्याने ‘गुरुपुष्मामृत योग’वर होणारी सोने खरेदी देखील होऊ शकली नाही. त्यामुळे या मुहूर्तावर अपेक्षित असलेली ४ ते ५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच जळगावातील सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडली नव्हती. त्यानंतर हळूहळू काही दुकाने सुरू होऊ लागली. मात्र काहीच वेळात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली.
मुहूर्त बारगळला
सुवर्ण खरेदीसाठी अत्यंत महत्त्व असलेला गुरुपुष्यामृत योग गुरुवारी आला होता. या योगावर अनेक जण सोने खरेदी करीत मुहूर्त साधत असतात. त्यामुळे गुरुवारी ४ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा होती. मात्र दुकानेच बंद असल्याने अनेकांना सोने खरेदी करता आली नाही.
ग्राहक पोहचलेच नाही
सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या जळगावात सोने खरेदीसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून ग्राहक येत असतात. मात्र बंदमुळे बाहेर गावाहून येणारे ग्राहक जळगावात पोहचलेच नाही. त्यामुळे सुवर्णबाजारात शुकशुकाट होता.
विवाह मुहूर्त नसणे व शेतकरीही शेती कामात व्यस्त असल्याने एरव्ही या दिवसात सराफ बाजारात उलाढाल कमी झालेली असते. त्यात गुरुपुष्मामृत योग आल्याने त्यानिमित्ताने उलाढाल वाढण्याची अपेक्षा होती. मात्र बंदमुळे खरेदीच टळल्याचे दिसून आले.
गुरुपुष्यामृत योगावर ४ ते ५ कोटींची उलाढाल होणे अपेक्षित होती. मात्र बंदमुळे दुकाने बंद राहिल्याने सराफ बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाले.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर असोसिएशन.