जळगावात आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:24 AM2018-11-01T11:24:12+5:302018-11-01T11:24:51+5:30
बाजारगप्पा : आवक घटल्याने गहू, डाळी, ज्वारी, बाजरी यांच्या भावात मोठी वाढ झाली
- विजयकुमार सैतवाल (जळगाव)
जळगावच्या बाजारपेठेमध्ये सर्वच मालाची आवक घटल्याने गहू, डाळी, ज्वारी, बाजरी यांच्या भावात मोठी वाढ झाली. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाऱ्या काळातच उडीद, मूग तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरी, दादरच्या भावात मोठी वाढ झाली. डाळींमध्ये या आठवड्यात पुन्हा, तर १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. गव्हाचे भावदेखील १०० रुपये प्रतिक्विंटलने वाढले आहेत. तांदळाचे भाव स्थिर आहेत. मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींमध्येही तेजी सुरू झाली असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ७,००० ते ७,५०० रुपये प्रतिक्विंटल मुगाची डाळ या आठवड्यात ७,१०० ते ७,६५० रुपये प्रतिक्विंटल झाली. उडदाच्या डाळीतही १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ होऊन ती ५,२०० रुपयांवरून ५,३०० ते ५,३५० रुपये झाली. गेल्या आठवड्यात ५,३०० ते ५,५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५,४०० ते ५,५५० रुपये प्रतिक्विंटल झाले. तूर डाळदेखील ५,६०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटलवरून ५,७०० ते ६,१५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.
चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५,५०० ते ५,८०० रुपयांवरून ५,६०० ते ५,९०० रुपये, उडदाचे भावदेखील ४,५०० ते ४,८०० रुपये प्रतिक्विंटलवरून ४,६०० ते ४,९०० रुपयांपर्यंत पोहोचले. गव्हाच्या भावात १०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४५० ते २,५५० रुपयांवरून २,५५० ते २,६५० रुपये प्रतिक्विंटल झाला. लोकवन गव्हाचा भाव २,४५० ते २,५०० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपयांवरून २,६५० ते २,७५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.