मनपाच्या उदासीनतेमुळे जळगावात रुग्णांची फिरफीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:14 PM2018-10-07T12:14:27+5:302018-10-07T12:15:41+5:30
एकाच रुग्णालयात प्रसूतीची सोय
विजयकुमार सैतवाल
जळगाव : कर्मचाऱ्यांची कमतरता, इमारतींची दुरवस्था, सुट्टीच्या दिवशी रुग्णवाहिकेचा चालक नसणे अशा बिकट परिस्थितीत मनपाच्या रुग्णालयात रुग्णसेवा सुरूअसून त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे चित्र मनपाच्या अनास्थेमुळे निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे केवळ एका वैद्यकीय अधिकाºयावर रुग्णालयाची मदार असून सुट्टीच्या दिवशी तर ‘इमर्जन्सी’ असली तरच डॉक्टर उपलब्ध होत असल्याचे अनुभव रुग्णांना येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या रुग्णालयांना विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यात सुधारणा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस हाल वाढत आहे. चेतनदास रुग्णालयातील प्रसूतीची सुविधाही बंद केल्याने रुग्णांना शिवाजीनगरपर्यंत फेरा पडत आहे.
प्रसुतीची व्यवस्था नसल्याने हाल
सिंधी कॉलनी भागात असलेल्या चेतनदास मेहता रुग्णालयात पूर्वीपासून असलेली प्रसूतीची सोय वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे बंद केली आहे. या रुग्णालयात शहरातील विविध भागांसह बाहेर गावाहून येणाºया रुग्णांनाही मोठा आधार व्हायचा. मात्र मनपाच्या अनास्थेमुळे ही सेवा बंद पडली. तांबापुरा, मेहरुण परिसर, सिंधी कॉलनी या भागातील रहिवाशांना सोयीच्या असलेले हे रुग्णालय सोडून आता शिवाजीनगरपर्यंत फेºया माराव्या लागत आहे.
‘सिव्हील’वरील ताण कमी होईल
एकीकडे जिल्हा रुग्णालयात प्रसूत महिलांसाठी जागा अपूर्ण पडत असताना दुसरीकडे मनपाच्या रुग्णालयात जागा धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी वाढीव खाटा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा रुग्णालयातील ताणही कमी होईल व रुग्णांचीही गैरसोय दूर होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांची वेळ निश्चित नाही
सुट्टीच्या दिवशी या रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर नसल्याचे अनुभव रुग्णांनी सांगितले. सुट्टी असल्यास एका डॉक्टरची इमर्जन्सी ड्यूटी लावली जाते. ते सकाळी येऊन पाहणी करून जातात व काही गंभीर रुग्ण आल्यास बोलविल्यानंतर रुग्णालयात येतात, अशी माहिती मिळाली. सकाळी डॉक्टरांची भेट झाली नाही, संध्याकाळी डॉक्टर किती वाजता येतील, या बाबत रुग्णालयात विचारणा केली असता, त्यांची येण्याची निश्चित वेळ नसल्याचे उत्तर मिळाले. पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकाºयांच्या खोलीला कुलूप असल्याचे दिसून आले. तेथे केवळ परिचारिका व इतर दोन महिला कामावर असल्याचे दिसून आले.
डी.बी. जैन रुग्णालयातील जागेचा उपयोग करावा
छत्रपती शाहू महाराज रुग्णालय एका संस्थेने चालविण्यास घेतल्याने मनपाच्या रुग्णालयातील प्रसूतीची सोय शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात करण्यात आली आहे. या रुग्णालयात मोठी जागा असतानाही केवळ २० खाटांचीच येथे सोय आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने खाटा वाढविल्यास अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे खाटा वाढविल्या जात नाही व एवढी मोठा जागा केवळ रिकामी पडून आहे. या रुग्णालयात प्रवेश करताच बाजूला असलेली मोठी खोली कुलूप लावून बंद करून ठेवलेली दिसून येते.
सुट्टीच्या दिवशी ओपीडी सुरु ठेवा
मनपाच्या चेतनदास मेहता व नानीबाई अग्रवाल या रुग्णालयांचीही पाहणी केली असता तेथे केवळ बाह्य रुग्ण तपासणीची (ओपीडी) सोय असल्याने सुट्टीच्या दिवशी ते बंद असतात. रविवारी त्यांना कुलूप लावलेले असल्याचे दिसून आले. सुट्टी असली तरी रुग्णांसाठी बाह्यरुग्ण तपासणीची सोय सुरू ठेवल्यास या भागातील रुग्णांना आधार होतो. अन्यथा जिल्हा रुग्णालयात या भागातील रुग्णांना धाव घ्यावी लागते. याची दखल घेऊन सुट्टीच्या दिवशीही येथे ओपीडी सुरू करण्याची मागणी या भागातील रहिवाशांची आहे.