पिंप्राळ्यातील विकासकामांच्या श्रेयावरून नगरसेवक व नागरिकांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:02+5:302021-05-28T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात दलितवस्ती सुधार व नगरोत्थान अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात दलितवस्ती सुधार व नगरोत्थान अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरुवात झाली आहे. मात्र या विकासकामांच्या श्रेयावरून नगरसेवक सुरेश सोनवणे व नागरिकांमध्ये गुरुवारी चांगलीच खडाजंगी झाली. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित आमदार सुरेश भोळे यांना या वादात मध्यस्थी करावी लागली.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विकासकामांच्या श्रेयावरून आता विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यात पिंप्राळा परिसरात गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांना सुरुवात झाली. गुरुवारी या भागातील लसीकरणाच्या ठिकाणाची पहाणी करून आमदार सुरेश भोळे यांनी या भागात सुरू असलेल्या विकासकामांचादेखील आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी हेदेखील उपस्थित होते. स्थानिक नगरसेवकांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या ठिकाणी कोणत्या निधीतून ही कामे होत आहेत याबाबत कोणताही फलक याठिकाणी लावला गेला नसल्याची तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्याकडे केली. त्यावर सुरेश भोळे यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा केली. त्यावर काही स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत विकासकामांमध्ये अडथळा घालू नका, अशा शब्दात नगरसेवकांना खडेबोल सुनावले.
कधीही विकासकामे झाली नाहीत आता तरी होऊ द्या
महापालिका स्थापन झाल्यापासून या भागात कोणतीही महत्त्वाची विकासकामे झालेली नाहीत, असा दावा स्थानिक नागरिकांनी केला. तसेच आता जर काही छोटी-मोठी विकासकामे या भागात होत असतील तर केवळ श्रेयवादासाठी या कामांमध्ये अडथळा आणू नका, अशा शब्दात स्थानिक नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांच्या समक्ष भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. तसेच या भागात होणाऱ्या विकासकामांचे श्रेय कोणीही घ्या, मात्र आधी कामे तरी होऊ द्या, असा सल्लादेखील नागरिकांनी नगरसेवकांना दिला.
आमदार भोळे यांनी केली मध्यस्थी, उपमहापौरांनीही दिला खुलासा
नागरिक प्रचंड आक्रमक असताना आमदार सुरेश भोळे यांनी नागरिकांची समजूत काढताना सांगितले की, या भागातील कोणत्याही कामाला अडथळा आणला जात नसून, केवळ कामाची पाहणी केली जात असल्याचे सांगितले. तसेच या भागात विकासकामे होणे आवश्यक आहेत आणि ते भविष्यातील केले जातील, असेही आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काही वेळातच याठिकाणी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हजेरी लावली. तसेच या ठिकाणच्या कामांबद्दल कोणीही श्रेय घेत नसून, कोरोनाच्या काळामुळे या ठिकाणी उद्घाटन होऊ शकले नाही, असा खुलासा उपमहापौरांनी यावेळी दिला. तसेच मनपा फंडातून ही कामे होत आहेत. यामुळे या भागातील नागरिकांचा फायदा होणार असल्याने याप्रकरणी कोणीही श्रेय घेऊ नये असाही टोला कुलभूषण पाटील यांनी यावेळी लगावला. या भागात झालेल्या वादाबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कोट..
याप्रकरणी काही विघ्नसंतोषी लोकांकडून श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरू आहे. याप्रकरणी जास्त न बोलता आपण आपल्या कामातूनच या लोकांना उत्तर देऊ.
- कुलभूषण पाटील, उपमहापौर
या भागात कोणताही वाद झाला नसून, लसीकरणाच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर या भागात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी काही वेळ थांबलो होतो. त्या ठिकाणी या भागातील कामांच्या बाबतीत उपमहापौरांसोबतदेखील चर्चा करण्यात आली.
- दीपक सूर्यवंशी, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप