मातीच्या रस्त्यामुळे पावसाळ्यात होताहेत प्रचंड हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:07+5:302021-05-16T04:15:07+5:30
खुबचंद साहित्या नगर : गटारींचीही दुरवस्था झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर जळगाव : गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या नगरमध्ये ...
खुबचंद साहित्या नगर : गटारींचीही दुरवस्था झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर
जळगाव : गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या नगरमध्ये नागरी वस्ती वाढली. मात्र, इतक्या वर्षात या ठिकाणी रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता आदी कुठल्याही समस्या लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने सोडविल्या नाहीत. यात पावसाळ्यात तर रस्त्याची समस्या अतिशय बिकट राहत असून, मातीच्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात चालण्यासाठीही वाट राहत नसल्याची खंत या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. तसेच गटारींच्या दुरवस्था झाल्यामुळे, सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यताही या रहिवाशांनी व्यक्त केली.
शहराला लागून असलेल्या खुबचंद साहित्या नगरमध्ये मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. शहरापासून दूर,नैसर्गिक आणि प्रदूषणमुक्त हा भाग असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस या भागात रहिवास वाढत आहे. मात्र, आज ना उद्या समस्या सुटतील, या आशेने या भागातील नागरी वस्ती वाढतच आहे. परंतु, दहा वर्षापासून या ठिकाणी रस्ते, गटारी व पथदिवे या तीन मुख्य समस्या सुटलेल्या नाहीत. या परिसरात सर्व ठिकाणी मातीचे रस्ते आहेत.काही ठिकाणी प्रशासनातर्फे रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली फक्त खडी टाकण्यात आली होती. मात्र, पक्का रस्ता न केल्यामुळे ही खडी इतरत्र पसरली आहे. मातीच्या रस्त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन, रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड होत आहे. त्यात रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले नसल्याने नागरिकांना या चिखलातून वाट काढतांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरात कुठेही कचरा कुंडी ना नियमित सफाई कर्मचारी येत नसल्याने रहिवाशांना उघड्यावरच कचरा टाकावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
इन्फो :
तर ऐन कोरोना काळात साथीचे आजार निर्माण होण्याची भीती
या रहिवाशांनी सांगितले की, या ठिकाणी गटारी आहेत. मात्र, या गटारींची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गटारी तुटल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून येत आहे.त्यात गटारींची अनियमित साफसफाई होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ऐन कोरोना काळात या ठिकाणी साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यताही या रहिवाशांनी व्यक्त केली.
इन्फो :
तक्रारी करूनही समस्या सुटेना
या रहिवाशांनी सांगितले की, येथील रस्ते, गटारी व पथदिवे लावण्या बाबत मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्याकडून एकही समस्या सुटली नाही. समस्या सोडविण्याच्या नावाखाली फक्त आश्वासन देतात आणि निवडणुका झाल्यावर नेते मंडळी तोंडही दाखवत नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, आतापर्यंत तक्रारी करूनही रस्ते, पथदिवे व गटारींची समस्या सुटलेली नाही. रस्त्यांची तर अतिशय बिकट अवस्था असून, पावसाळ्यात येथील मातीच्या रस्त्यातून नागरिकांना पायी चालणेही अवघड होत आहे.
राजेंद्र पाटील, रहिवासी
येथील समस्यांबाबत जळगाव मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, कुठलीही समस्या सुटलेली नाही. रहिवाशांना यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गटारींची तर अत्यंत दुरवस्था झाली असून, यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहून येत आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रकांत मोरे,रहिवासी
या भागात रस्ते, गटारी, पथदिवे व स्वच्छतेच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत. याबाबत रहिवाशांनी अनेकदा मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडेही तक्रारी केल्या. मात्र, कुठलीही समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कलाबाई पाटील, रहिवासी