दुष्काळातही चाळीसगावात लग्नसराईचा सुकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:36 PM2018-12-14T16:36:22+5:302018-12-14T16:38:22+5:30
अत्यल्प पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना लग्न सराईचा सुकाळ दिसून येत आहे. शहरातील ७० टक्के मंगल कार्यालयांची बुकिंग झाली आहे.
चाळीसगाव - अत्यल्प पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना लग्न सराईचा सुकाळ दिसून येत आहे. शहरातील ७० टक्के मंगल कार्यालयांची बुकिंग झाली आहे.
येत्या साडेचार महिन्यात ७१ विवाह मुहूर्त आहेत. मार्च महिन्यापर्यंत ७० टक्के बुकिंग झाले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यातील लग्नपत्रिकांची सध्या छपाई सुरू आहे. शहरातील बँडपथक सज्ज झाले असून त्यांच्याही बुकिंग झाल्या आहेत. तसेच केटर्स सामानाच्या जुळवाजुळवसाठी कामाला लागले आहेत.
१२ डिसेंबर पासून लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लग्नकार्य पुढे ढकलले जाईल अशी शंका दसऱ्या दरम्यान व्यक्त करण्यात येत होती. मात्र ती फोल ठरली आहे. कारण मंगलकार्यालयांमध्ये मार्च महिन्यापर्यंत कुठे ६० टक्के तर कुठे ७० टक्के तारखा बुक झाल्याचे कार्यालय मालक सांगतात.
पंचांगात दिल्याप्रमाणे १२ डिसेंबर रोजी पहिली लग्नतिथी असून शहरातील मंगलकार्यालयाच्या मालकाने सांगितले की, दुष्काळाचा शहरातील लग्नसराईवर फारसा परिणाम होत नाही. लग्नाचे आर्थिक नियोजन अगोदरच करून ठेवलेले असते. जे नियोजन पूर्व लग्न करतात ते लग्नाच्या तीन ते चार महिने आधी मंगलकार्यालय बुकिंग करून ठेवतात. सध्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील बुकिंग सुरू आहेत. शहरात लहानमोठे सुमारे १०० च्या वर केटर्स्आहेत.
शहरातील एक किराणा व्यापाºयाने सांगितले की, दिवाळीनंतर लग्नासाठी किराणा खरेदी सुरू झाल्याने बाजारपेठेत मंदी जाणवत नाही. साधारणत: लग्नाच्या १५ दिवस आधीच लग्नघरासाठी किराणा सामान खरेदी केला जातो. तर केटरिंग व्यावसायिक लग्नतिथीच्या दोन तीन दिवस आधी किराणा सामान खरेदी करतात. सध्या शहरातील किराणा व्यावसायिकांकडे गर्दी दिसून येत आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर तुळशीविवाह होऊन लग्नसराईला सुरुवात होते परंतु यंदा गुरुअस्त असल्याने तब्बल महिनाभर उशिराने लग्नसराईला सुरुवात केली जात आहे.
शहरात १२ डिसेंबर पासून लग्नसराई सुरू होत असली तरी कापड दुकानात शहरातील तसेच खेड्यातील मंडळी लग्नबस्ताची जोरात खरेदी करतांना दिसत आहेत शहरातील ग्राहकांचीच बस्ता खरेदी अधिक प्रमाणात आहे.