कोरड्या हवामानाचा परिणाम, पुढील दोन आठवडे उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:01 PM2019-04-22T12:01:58+5:302019-04-22T12:02:30+5:30
केळीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता
जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता उत्तर महाराष्टÑ व विदर्भावर तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यामुळे उत्तर-पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे सक्रीय झाले आहेत. पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पारा ४१ अंशापेक्षा जास्त राहिला. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
ढगाळ वातावरणाने दिलासा
मात्र १४ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात ६ ते ७ अंशाची घट होवून ४३ अंशावर गेलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे काही दिवस का असेना नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र कोरडे हवामान पहायला मिळत असून, वातावरणातील आर्द्रता देखील कमी झाली असल्याने तापमानात वाढ होणार आहे.
दरम्यान, रविवार २१ रोजी जळगावचे तपामान ४० अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले. यात आणखी वाढ होणार आहे.
उष्ण लाटेचे कारण
मध्य महाराष्टÑ ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाची ट्रफ रेषा तयार झाली होती. त्यातच पश्चिम भागाकडून येणारे उष्ण वारे व बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे गारपीट देखील गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झाली. मात्र, आता हवेचा कमी दाबाची रेषा कर्नाटक व तेलंगणाकडे सरकली आहे.
त्यातच उष्ण वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोरड्या हवामानासह जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २४ एप्रिल ते ५ मे दरम्यान उष्ण लाटेचे प्रमाण सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
केळीला फटका... गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व वादळामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले होते. आता उष्ण लाटेमुळे केळीच्या मृगबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अति उष्णतेमुळे केळीची वाढ खुंटण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. तसेच वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या चोपडा आणि जळगाव तालुक्यातील कठोरा, सावखेडा, किनोद भागातील केळीचे अद्यापही पंचनामे न झाल्यामुळे या भागातील शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.