बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:33 PM2019-04-09T19:33:20+5:302019-04-09T19:34:34+5:30
तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
रावेर, जि.जळगाव : तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
हतनूर सिंचन प्रकल्पाचा एकूण जलसाठा ३८८ दलघमी आहे. यंदा तापी व पूर्णा नदीतून मान्सुनोत्तर जलप्रवाहाची आवक यंदा शून्य राहिल्याने वाढते तापमान व प्रकल्पात साधारणत: ५४ टक्के गाळाचे प्रमाण आहे. यामुळे आजमितीस ५०.५१ टक्के जलसाठा आटल्याने केवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.
हतनूर प्रकल्पाचा मृत जलसाठा १३३ दलघमी असल्याने त्यातील केवळ ६३ दलघमी जिवंत जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. त्यात प्रकल्पातील ५४ टक्के गाळाचे वाढते प्रमाण पाहता ३४ दलघमी गाळाचा साठा आहे. ‘मे हिट’सदृश्य तापमानाचा धडाका मार्च अखेरपासूनच सुरू झाल्याने दररोज या प्रकल्पातून ०.२५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे भीषण व धोकादायक प्रमाण आहे. हे पाहता तापमानात आणखी वाढ झाल्यास या कोरड्या उन्हाळ्यात जूनअखेरपर्यंत सुमारे २० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व भूस्तरही कोरडाठक्क असल्याने झिरपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकंदरीत, या ६३ दलघमी उपलब्ध जलसाठ्यातून ५४ दलघमी गाळामुळे व बाष्पीभवनामुळे आटणार असेल तर जूनअखेरपर्यंतच्या ८३ दिवसांपर्यंत केवळ नऊ दलघमी उपलब्ध जलसाठ्यात बिगर सिंचन २१ पाणी वापर संस्थांच्या आरक्षित ४८ दलघमी पाण्याचे नियोजनासाठी तुटपुंंजे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आयुध निर्माणी फॅक्टरी वरणगाव, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी, मुक्ताईनगर, संत मुक्ताई शुगर फॅक्टरी मुक्ताईनगर, नांदुरा तालुक्यातील २७ गावांची पाणीपुरवठा योजना, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा, कुºहे, टाकळी, महालखेडा, काकोडा, वढवे, बोदवड, कोºहाळा, ८१ गावांची बोदवड व तळवेल पाणीपुरवठा योजना, अकोला एमआयडीसी, मलकापूर, मुक्ताईनगर, रावेर व सावदा न.पा. तथा गहूखेडा सामूहिक पाणीपुरवठा योजना या २१ संस्थांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करण्याच्या तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी अत्यावश्यक ते निर्बंध आणण्याबाबत हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी.महाजन यांनी सूचित केले आहे.
तातडीची वा पर्यायी व्यवस्थेचे आवाहन
हतनूर प्रकल्पाची माहे मे व जूनमध्ये जलपातळी घसरल्यानंतर दोन्ही नद्यांचे प्रवाह खंडित झाल्यास पाणीटंचाई निर्र्मूलनासाठी आपापल्या योजनांच्या उद्भवापर्यंत खंडित पाण्याचे तोड्यांपासून समांतर चारी काढून जलप्रवाह सुकर करणे वा योजनांचा सेक्शन पाईप तोड्यांपर्यंत पोहोचवण्याची तातडीची उपाययोजना करावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचे आवाहन हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी. महाजन यांनी केले आहे.