चौगाव शिवारात तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:43 PM2019-04-30T14:43:58+5:302019-04-30T14:44:42+5:30
गंभीर जखमी : बैलांना पाणी पाजत असताना झाली दुर्घटना
चोपडा : शेतातील कामे उरकून दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असतांना बैलांचा धक्का लागल्याने एक तरुण विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चौगाव शिवारात घडली. विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चौगाव ता.चोपडा येथील शांताराम तानकु कोळी (वय-४५) हे नेहमी प्रमाणे सोमवार २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतीकाम करण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील काम उरकून शांताराम कोळी चौगाव शिवारातील पंडीत मोतीराम धनगर यांच्या शेतातील विहिरी जवळ बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले. पाणी पाजत असतांना कोळी यांना बैलांचा धक्का लागल्याने ते विहिरीत पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ.गुरुप्रसाद वाघ यांनी त्यांना मृत घोषित केले. शांताराम कोळी यांच्या पश्चात आई , दोन मुले, तीन मुली, भाऊ, बहीण असा परीवार आहे. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला डॉ.गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत.
धनवाडी शिवारातून बैलजोडीची चोरी
चोपडा शहरातील पाटील गढी भागातील रहिवासी विनायक खंडेराव देशमुख (वय-६५) यांच्या मालकीची बैलजोडी धनवाडी शिवारातील खळ्या मधून चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक खंडेराव देशमुख रा. पाटील गढी चोपडा या शेतकऱ्याची सुमारे तीस हजार रुपये किंमतीची बैलजोडी धनवाडी शिवारातील गट नंबर ३४७ शेतामध्ये असलेल्या खळ्यात लिंबाच्या झाडाला बांधलेली बैलजोडी २५ एप्रिलच्या मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.