दुष्काळामुळे बिबट्यांची नागरीवस्तीकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:35 PM2019-02-11T14:35:58+5:302019-02-11T14:37:58+5:30
वनविभाग करणार जिल्ह्यातील वनक्षेत्रात १०० पाणवठे
जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळेच पाणीटंचाई निर्माण झाल्याने तृणभक्षी प्राणी नागरी वस्त्यांकडील हिरवळीकडे वळतात. तर त्या प्राण्यांच्या शिकारीसाठी वाघ, बिबटे देखील नागरीवस्त्यांकडे धाव घेत असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी वनविभाग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील वनक्षेत्रात मिळून एकूण १०० पाणवठे तयार करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक डी.डब्लू. पगार यांनी दिली.
जिल्ह्यातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जंगलातील वाघ, बिबट्या यांचा अधिवास धोक्यात आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यातच दुष्काळामुळे परिस्थिती भिषण बनली आहे.
नागरी वस्तीकडे वळलेल्या या वन्यप्राण्यांना मात्र नागरिकांकडून ठार मारले जाते. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
मानवी हस्तक्षेपाने अधिवास धोक्यात
जंगली भागात मानवी हस्तक्षेप वाढत असल्यानेच वाघ व बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
धरणे तसेच उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगले नष्ट केली जात असतानाच वनजमीनीवर हक्क सांगण्यासाठी रातोरात घनदाट जंगलात झाडे तोडून, अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अगदी दाट व वन्य प्राण्यांच्यादृष्टीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जंगलातही मानवी वावर वाढला आहे. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
२०१४ मध्ये शासननिर्णय
दुष्काळी परिस्थिती असल्याने जंगलातील पाणवठे आटून वाघ, बिबट्यासारखे हिंस्त्रप्राणी नागरीवस्तीकडे वळू नयेत, यासाठी २०१४ मध्ये शासनानेच शासन निर्णय काढून मांसाहारी प्राणी असलेल्या जंगलात प्रत्येक तालुक्याच्या हद्दीत पाणवठे तयार करण्याचे व त्यात पाणीसाठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यंदाही दुष्काळ जाहीर झालेला असल्याने त्यादृष्टीने उपाययोजना होणे गणजेचे आहे.
१०० पाणवठे करणार
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी जंगलात असलेल्या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वनक्षेत्रात मिळून १०० नवीन कृत्रीम पाणवठे तयार करून त्यात पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यापैकी २० पाणवठे वनविभाग स्वनिधीतून करणार आहे.
मात्र ८० पाणवठ्यांसाठी नियोजन समितीकडून निधीची मागणी केली. एका पाणवठ्यासाठी सुमारे १ लाख रूपये व पाणी टाकण्यासाठी वेगळा खर्च येणार आहे.
याखेरीज प्लास्टिक ड्रम कापून जमिनीत गाडून त्यात पाणी भरण्यात येणार आहे.
वनविभागाची भिस्त ‘नियोजन’वरच
वनविभागाने वढोदा वनक्षेत्रात वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र करण्यासाठी सोलर कुंपण करण्यासाठी ३३.२० लाखांचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मात्र शासनाने त्यासाठी निधी देणे नाकारल्याने आता नियोजन समितीकडून निधीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाणीटंचाईमुळे मानवीवस्तीकडे धाव
उन्हाळ्यात जंगलातील अनेक पाणवठे आटतात. त्यातही नागरीवस्तीलगतच्या माळरान जंगलात राहणाºया बिबट्यांचे खाद्य असलेले तृणभक्षी प्राणी गावांलगतच्या ओलिताखालील क्षेत्राकडे वळतात. त्यांच्या शिकारीसाठी बिबटेही नागरी वस्तीकडे वळतात. रात्रीच्या अंधारात वाट चुकलेले बिबटे त्यामुळेच नागरी वस्तीत घुसलेले दिसतात. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने वनविभागाने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
कातडी तस्करीचे रॅकेट असल्याची चर्चा
भुसावळ येथे ८ मे २०१८ रोजी बिबट्याची कातडी विकणाºयांना छापा टाकून पकडण्यात आले होते. या टोळीचे धागेदोरे थेट आंध्रप्रदेशपर्यंत जात असल्याचा संशय होता. मात्र वनविभागाचा तपास दोन-तीन महिन्यातच थंडावला. मागच्या वर्षी मध्यप्रदेशात दोन आरोपींना बिबट्याची कातडी विकताना पकडण्यात आले होते. हे दोघे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी ती कातडी कोठून आणली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात वाघांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या असून यातील काही घटना नैसर्गिक नाहीत. त्यामुळे वाघांचा मृत्यू चिंताजनक बाब आहे. गावांच्या बाहेरचे पडीक जागांवरील झुडपी जंगले, माळरान हेच प्रामुख्याने बिबट्यांचे अधिवास असतात. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे तसेच एमआयडीसीसाठी मोठ्या प्रमाणावर या जागांवर मानवी वावर वाढला असून बिबट्यांचे अधिवास संपुष्टात येत आहेत.
-किशोर रिठे, व्याघ्र अभ्यासक
वन्य प्राण्यांचा विशेषत: वाघ व बिबट्यांचा जीव वाचविण्यासाठी नागरिकांमध्येच जनजागृती करण्याची गरज आहे. काही ठिकाणी लोकांना वन्यप्राण्यांबद्दल प्रेम वाटते. जामनेर तालुक्यातील एका गावात बिबट्याचे पिल्लू सापडले होते. त्या पिल्लाला त्याची आई सापडावी म्हणून त्या ग्रामस्थांनी प्रार्थना केली होती. दुसरीकडे चाळीसगाव तालुक्यात बिबट्या आढळला होता. त्यावेळी लोकांनी मात्र वनविभागाला हैराण करून टाकले होते. त्यामुळेच लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.
-विवेक देसाई, वन्यजीव अभ्यासक.