अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:41 AM2019-11-01T11:41:01+5:302019-11-01T11:41:44+5:30
प्राथमिक अंदाज : अहवाल सादर; जामनेर, चाळीसगाव, चोपड्यात सर्वाधिक फटका
जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ५ लाख ५ हजार ८७७ शेतकऱ्यांचे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी व शासनास सादर केला आहे. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. २१ ते २९आॅक्टोबर या कालावधीत तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिवाळीच्या सुट््यांमुळे त्यात अडचण निर्माण झाली होती.
अखेर बुधवारपासून पंचनामे सुरू झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवालही कृषी विभागाने सादर केला आहे.
सर्वात कमी नुकसान रावेरमध्ये
तर सर्वात कमी नुकसान रावेर व बोदवड तालुक्यात झाले आहे. रावेर तालुक्यातील १२० गावांमधील १६ हजार ८३७ शेतकºयांचे १५ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात ५२ गावांमधील १७ हजार ४५६ शेतकºयांचे १८ हजार ३७१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
कोरडवाहूचे ४ लाख ६१ हजार हेक्टरचे नुकसान
४जिल्ह्यातील कोरडवाहू पिकांचे ४ लाख ६१ हजार १५९ हेक्टरचे तर बागायतीचे १ लाख ३६ हजार ८०४ हेक्टरचे व बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कोरडवाहू मध्ये खरीप ज्वारी ३८ हजार २८८ हेक्टर, कापूस ३ लाख १७ हजार ८९३ हेक्टर, मका ७७ हजार ३५६ हेक्टर, बाजरी ८ हजार ७६९ हेक्टर, सोयाबीन १७ हजार १०१ हेक्टर, तूर १११४ हेक्टर, तीळ ३ हेक्टर, भुईमूग ३०५ हेक्टर तर इतर पिके ३३० हेक्टर, बागायती पिकांपैकी चार पिके २३० हेक्टर, कापूस १ लाख २३ हजार ९८६ हेक्टर, ऊस ११७६ हेक्टर, भाजीपाला २२३३ हेक्टर, पपई २९९ हेक्टर, कांदा ३२८५ हेक्टर, केळी ५५९५ हेक्टर तर बहुवार्षिक पिके- १८६७ हेक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळाली.
जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ हेक्टरचे नुकसान जामनेर तालुक्यात झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे.