अमळनेरातील भाटे भगिणींची भूतदया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:05 AM2019-03-08T00:05:17+5:302019-03-08T00:05:36+5:30
नि:स्वार्थ सेवा
महेंद्र रामोशे
अमळनेर - बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यांना पुन्हा माणूस म्हणून उभे केले. त्याच धर्तीवर अमळनेर शहरातील पोलीस लाईन सामोरील भाटे भगिनी मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत. अपघातग्रस्त, रोगट, अर्धमेलेले मोकाट श्वानांची सेवा करीत त्यांच्यासाठी आपले जीवन समर्पित या भगिनींनी केले आहे. आपल्या आई आणि भावा पासून मिळालेला वारसा कुसुम भवानजी भाटे, चारुशीला भाटे, आणि अनुपमा भाटे या तिघी बहिणी चालवत आहेत.
शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा कुठेही अपघात झाला किंवा त्यांना काही दुर्धर आजर लागला, नाल्यात पडला तर ते श्वान या भाटे भगिनींकडे सोडले जाते. या तिन्ही बहिणी धावत-पळत जाऊन त्या श्वानाला तात्काळ दवाखान्यात नेऊन त्यावर स्वखर्चाने उपचार करतात. अनेकवेळा उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी कर्ज देखील घेतले आहे.
संकटांना द्यावे लागते तोंड
कुसुम भाटे यांनी आपली कहाणी सांगताना सांगितले की, आम्ही श्वानांची सेवा करतो म्हणून आमच्यावर दगड धोंडे फेकले जातात, मारहाण केली जाते, घाण फेकली जाते इतकेच नाही आम्हाला वेडे ठरवले जाते. मात्र असे असले तरी आम्ही कुठेही श्वानांना त्रास होत असेल तर आम्ही त्याची सुटका करतो आणि त्याला घरी घेऊन येतो. आज या भाटे भगिनींकडे १२५ लहान मोठे श्वान आहेत. त्यात अपघातग्रस्त झालेली, कोणाला आजार झालेला तर कोणते विहीर,गटारमध्ये पडलेले असे अनेक श्वान त्यांनी आज वाढवलेली आहेत.
आई आणि भावाने स्थापन केलेल्या ‘ज्ञान कस्तुरी श्वान सेवा संस्थेच्या’ माध्यमातून या भगिनी श्वानांची सेवा करत आहेत. गेल्या ५०वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे.
या कार्यात त्यांना त्रास देणारे कमी नाहीत मात्र मदत करणारे सुद्धा आहेत. त्यांची नावे या भगिनींच्या तोंडपाठ आहेत. प्राण्यांचे औषधे मोफत देणारे जळगावचे डॉ.मनीष बाविस्कर, अजय ललवाणी, अमोल नाथबुवा, ज्ञानेश्वर भोई, ज्ञानेश्वर पाटील, सिंदूबाई पारे, शांताराम बोरसे, धनराज पाटील आदी त्यांना दूध चारा आणि औषध मोफत देतात. इतकेच नव्हे तर न्या. दिनेश कोठलीकर यांच्या परिवाराचे सदस्यदेखील भरीव मदत करतात. त्यांची मुंबई येथे बदली झाली असली तरी ते आजदेखील मदत पाठवत आहेत, असा उल्लेख भाटे यांनी केला
श्वानासोबत भाटे भगिणींकडे १९ गाई आहेत. ज्या भाकड आहेत, मात्र तरीही त्यांची सेवा या भगिनी मनापासून करत आहेत. श्वान आणि गाई त्यांचे संगोपनासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्यांना शासनाने अनुदान द्यावे, तसेच प्राण्यांच्या संगोपनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध कारून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ती पूर्ण व्हावी, अशी भाटे भगिनींची मागणी आहे. या मोकाट श्वानांची सेवा करता यावी म्हनून या भाटे भगिनीं अतिशय साधं जीवन जगतात व पैसे वाचवून श्वान, मांजर, आणि गाईची सेवा करतात.
श्वानांची काळजी घ्या
विदेशी जातीच्या श्वानांमुळे गावठी श्वानांवर अन्याय होतो. विदेशी श्वान पाळण्यापेक्षा प्रत्येकाने गावठी श्वान पाळावी, म्हणजे त्यांना आधार मिळेल व पोट भर जेवणदेखील मिळेल. शिवाय नगर परिषदने श्वानांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच नागरिकांदेखील घराच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन भाटे भगिनींनी केले आहे.