जळगावात आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:06 PM2019-05-17T13:06:21+5:302019-05-17T13:06:47+5:30
उत्पादक हवालदिल
जळगाव : कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी-कमी होत असून कांद्याचे भाव ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. भाव कमी होत असल्याने कांदा उत्पादक चांगलेच हवालदिल झाले असून सध्या जो भाव मिळत आहे, त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची आवक दुप्पट झाल्याने बाजार समितीमध्ये कांद्याच्या गोण्यांचा ढीग लागला आहे.
महिनाभरात आवक दुप्पट
आॅक्टोबर महिन्यानंतर एप्रिल महिन्यापासून पुन्हा कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कांद्याची आवक जवळपास दुप्पट झाली आहे. एप्रिल महिन्यात ६०० क्विंटल असलेल्या आवकमध्ये वाढ होत जावून १६ मे रोजी कांद्याची आवक १४०० क्विंटलवर पोहचली. त्यामुळे कांद्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते २५० ते ९०० रुपये प्रती क्विंटलवरून ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. यात दर्जानुसार कांद्याला मिळणाऱ्या भावामध्ये कमी दर्जाच्या कांद्यापाठोपाठ उच्च दर्जाच्या कांद्याच्या भावातही घसरण होऊन उच्च दर्जाचा कांदा ९०० रुपये प्रती क्विंटलवरून ८०० रुपये प्रती क्विंटलवर आला.
आवक वाढली, खरेदी थांबली
सध्या जळगाव तालुक्यासह एरंडोल व इतर तालुक्यातून तसेच धुळे जिल्ह्यातूनही कांद्याची आवक सुरू आहे. दुसरीकडे मात्र साठा करणाऱ्यांनी कांद्याची खरेदी थांबविली असल्याचे सांगण्यात आले. मार्च-एप्रिल महिन्यात व्यापारी कांद्याची साठवणूक करून ठेवतात. त्या वेळी कांदा खरेदी झाल्याने आता पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांनी कांद्याची खरेदी थांबविली आहे. त्यामुळे मागणी नसल्याने कांद्याचे भाव कमी होत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
पुढील महिन्यापासून इतर जिल्ह्यातूनही येणार कांदा
सध्या खान्देशातील कांद्याची आवक सुरू असून जून महिन्यापासून नाशिक जिल्ह्यासह पुणेरी कांद्याची आवकही सुरू होणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे ही आवक सुरू झाल्यानंतर आणखी भाव घसरतात की काय अशी चिंता कांदा उत्पादकांना लागली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मे आवक
गेल्या वर्षाची तुलना पाहता मे २०१८मध्ये कांद्याची आवक २२०० क्विंटल होती. त्या वेळीदेखील आवक वाढल्याने कांदा २७५ ते ५७० रुपये प्रती क्विंटलवर आला होता. यंदा ही आवक निम्मी असून गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव दिलासादायक आहे. मात्र असले तरी सध्या जो भाव मिळत आहे, त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याची बिकट स्थिती असल्याचेकांदाउत्पादकांनीसांगितले.
घसरण थांबता थांबेना
कांद्याचे भाव पाहता हिवाळ््यापासूनच त्याच्या भावात घसरण सुरू असून ती अद्यापही कायम आहे. आॅक्टोबर महिन्यापासून जळगाव बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक वाढत जाऊन त्याचे भाव कमी-कमी होत गेले. नवीन कांद्याची आवक सुरू होताच १० आॅक्टोबर रोजी चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव १००० रुपये प्रती क्विंटलवर आले होते. त्यानंतर मात्र दुसºया आठवड्यात आवक ६०० क्विंटलवरून २७५ क्विंटलवर आली व कांद्याच्या भावांमध्ये सुधारणा होऊन कांद्याचे भाव १७५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. त्यानंतर त्याच्या दुसºया आठवड्यात कांद्याची आवक ७७५ क्विंटलवर पोहचली व भाव १४५० रुपयांवर आले. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी कांद्याची आवक थेट २१०० क्विंटल झाली. त्यानंतरही आवक दिवसेंदिवस वाढत जाऊन दररोज ५० रुपये प्रती क्विंटलने भावात घट होत गेली. ७ डिसेंबर रोजी तर कांद्याच्या आवकने उच्चांकी गाठत एकाच दिवसात कांद्याची ३०५० क्विंटल आवक झाली व चांगल्या दर्जाचा कांदा ८०० रुपये प्रती क्विंटलवर आला होता. आतादेखील आवक वाढत गेल्याने १६ मे रोजी कांदा पुन्हा ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानमधून कांद्याची आयात केल्याने नाशिकसह अनेक ठिकाणचा उन्हाळी कांदा शिल्लक राहिला. हा कांदा विक्री होत नाही तोच नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे भाव कमी-कमी होत गेल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.
किरकोळ बाजारात भाव ‘जैसे थे’
कांद्याचे भाव गडगडले असले तरी त्याचा ग्राहकांना फायदा नसल्याचे चित्र किरकोळ बाजारात आहे. एकतर कमी भाव मिळत असल्याने उत्पादक हवालदिल झाले तर या कमी भावाचा फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा अजूनही १० ते १५ रुपये प्रति किलोनेच विक्री होत आहे.
जिल्हाभरात स्थिती बिकट
जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपड्यासह अडावद, लासूर, किनगाव, चहार्डी या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच चाळीसगाव, यावल तालुक्यातील किनगाव व परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र हा कांदा त्या-त्या बाजार समिती व उप बाजात समितीमध्ये विक्री होत असून तेथेही कांद्याचे भाव गडगडले असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर चोपडा तालुक्यात व्यापारी मंडळी गावांमध्ये जाऊन कांद्याची खरेदी करतात. तेथेही भाव कमीच मिळत असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातूनही कांद्याची आवक सुरू असून पुढील महिन्यापासून नाशिक व पुणे जिल्ह्यातील कांद्याची आवक सुरू होईल.
- वासू पाटील, विभाग प्रमुख, फळे व भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.
कांद्याचे भाव दररोज कमी होत असून यामुळे मोठे संकट कांदा उत्पादकांवर ओढावले आहे. सध्या जो भाव मिळत आहे, त्यात उत्पादन खर्चही निघत नाही.
- वसंत धनगर, कांदा उत्पादक.