जळगावात आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:13 PM2018-11-15T12:13:03+5:302018-11-15T12:13:29+5:30
भाजीपाला : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात २०० रुपये प्रतिक्विंटलने घट होऊन लाल टोमॅटो १००० रुपये प्रतिक्विंटलवरून ४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले आहेत.
टोमॅटोची आवक कमी होऊन तीन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. त्यामुळे भाववाढ होऊन ते १५०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. मात्र या आठवड्यात टोमॅटोची आवक वाढून भाव थेट २०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते ३५० ते १००० रुपये प्रतिक्विंटलवर आले. कोथिंबीर १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल आहे.