शिक्षक हजर न झाल्याने ढालगाव उर्दू शाळेला ठोकले कुलूप, विद्यार्थ्यांना घेऊन पालक जिल्हा परिषदेमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:00 PM2019-07-04T12:00:13+5:302019-07-04T12:00:36+5:30
नियुक्ती होऊनही शिक्षक हजर होईना
जामनेर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक हजर न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी गुरुवारी शाळेला कुलुप ठोकले. या सोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांना जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भेटीसाठी घेऊन निघाले.
शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेत शिक्षक न आल्याने विद्यार्थ्यांना घेऊन पालक थेट जामनेर पंचायत समितीमध्ये पोहचले होतेव तेथेच शाळा भरविली होती. त्यानंतर दोन शिक्षक शाळेला मिळाले. मात्र गेल्या आठवड्यात शिक्षकांच्या पदोन्नती व बदली प्रक्रियेदरम्यान शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये या शाळेसाठी जे दोन शिक्षक मिळाले, ते अद्यापही हजर झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी गुरुवार, ४ जुलै रोजी थेट शाळेला कुलुप ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन ते जळगाव येथे रवाना झाले.