लागवडीचा खर्च निघत नसल्याने भाजी उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:04 PM2020-04-18T16:04:49+5:302020-04-18T16:05:51+5:30
तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे.
जामनेर, जि.जळगाव : यंदा तालुक्यातील काही भागात भाजीपाला व कलिंगड, पपई आदी फळांचे चांगले उत्पादन येऊनदेखील लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत जाऊन माल विकता येत नसल्याने शेतकर्यांना व्यापारी व भाजी विक्रेत्यांना मातीमोल भावात विकावा लागत आहे. लागवडीसाठी झालेला खर्चसुध्दा निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.
वाघूर धरणातील बॅकवॉटरचा फायदा घेत केकतनिंभोरा, चिंचखेडे, हिवरखेडे बुद्रूक, पळासखेडे बुद्रूक व नेरी परिसरातील शेतकऱ्यांना झाला. या शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले आल्याने उत्पन्नदेखील चांगले मिळेल अशी शेतकºयांंना आशा होती.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे टमाटे, भेंडी, मिरची, वांगे, चवळी, गवार यासोबतच कलिंगडला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. झालेला खर्चदेखील निघत नसल्याने मिळेल त्या भावात भाजीपाला विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी अशोक पाटील, प्रशांत गायकवाड, लक्ष्मण पाटील व अण्णा पाटील यांचे म्हणणे आहे.
या भागातील शेतकरी भुसावळ व जळगाव येथील मार्केटला विक्री करतात. लॉकडाऊनमुळे भुसावळ बाजार बंद असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
व्यापारी शेतकºयांकडून मातीमोल भावाने माल खरेदी करुन बाजारात चढ्या दराने विकत असल्याचे चित्र आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दाबला गेला असून, यंदा कोरोनामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी व्यापाºयांना मातीमोल भावात विकण्यापेक्षा शहरात जाऊन विक्री करीत आहेत.
टमाटे लागवडीवर प्रति एकर ३० ते ४० हजार खर्च आला. बाजारात भाजी विक्रेते ५० ते १०० रुपये कॅरेटने मागतात. यात मजुरीचाही खर्च निघत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयास शासनाने मदतीचा हात दिला तरच तो जगू शकेल.
-अशोक कृष्णा पाटील, शेतकरी, केकतनिंभोरे, ता.जामनेर